नवी दिल्लीः पासपोर्टवर कोणत्याही अर्जदाराला वडिलांच्या नावाचा उल्लेख करण्याची सक्ती करणं योग्य नाही. कायदेशीरपणे वडिलांच्या नावाचा उल्लेख करणं आवश्यक नाही, असं दिल्ली हायकोर्टाने सांगितलं आहे.
अर्जदाराने पासपोर्टवर वडिलांच्या नावाचा उल्लेख केला नसेल तर त्याला त्याविषयी कसलीही विचारणा न करता पासपोर्ट मंजूर करावा, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. पासपोर्ट कार्यालयाने वडिलांच्या नावाचा उल्लेख नाही म्हणून अर्ज नाकारला, अशी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल झाली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
पासपोर्ट कार्यालयाने याचिकाकर्त्याचा जूना पासपोर्टही रद्द केला होता. नवा पासपोर्ट जारी करण्यासाठी आवेदन केलं असता, पासपोर्ट अधिकाऱ्यांनी युवकाची अडवणूक करत पासपोर्ट नाकारला. याविरोधात या युवकाने थेट हायकोर्टात धाव घेतली. या युवकाच्या आईचा वडिलांसोबत 2003 साली घटस्फोट झाला आहे.