अहमदाबाद : अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमच्या मंचावरुन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिलाय. ‘पाकिस्तानने दहशतवादाचे अड्डे नष्ट , आपल्या देशाची सीमा सुरक्षित ठेवण्याचा अधिकार प्रत्येक देशाला’ असं डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला सांगितलं


भारताबरोबरचे संरक्षणसंबंध आम्ही बळकट करणार आहोत. आम्ही उत्तम शस्त्रांची निर्मिती करतोय आणि भारताबरोबर आमचा व्यापार सुरु असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तसेच आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत. घुसखोरांपासून सीमा सुरक्षित करण्याचा प्रत्येक देशाला अधिकार आहे.  इस्लामिक दहशतवादापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत. आम्ही आज इसिसला 100 टक्के संपवले असून आयसीसचा म्होरक्या अल बगदादीला ठार झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.

अहमदाबादमधील मोटेरा या जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं पंतप्रधान मोदींनी भव्य स्वागत केलं. यावेळी स्टेडियमवर दोन लाखाहून अधिक लोकांनी उपस्थिती लावली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि भारताचं तोंडभरुन कौतुक केलं.

पंतप्रधान मोदी देशासाठी स्तुत्य काम करत आहेत, मोदींच्या नेतृत्त्वात भारताची अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. मोदी माझे खरे मित्र असून चॅम्पियन असल्याचं ट्रम्प म्हणाले. तुम्ही दिलेलं प्रेम कधीही विसरणार नसून भारतीय जनतेनं जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मी आभारी असल्याचं ट्रम्प म्हणाले. भारताने जगाला मानवतेचा धडा दिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी स्तुत्य काम करत असल्याचं ट्रम्प बोलले.

भारत एक मुक्त समाज आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेमध्ये स्वाभाविक मैत्री आहे. काही वर्षात भारत गरीबीतून मुक्त होईल. तुम्ही प्रचंड प्रगती करुन पुढे जाणार असल्याता विश्वास यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केला.



यापुढचा कसा असेल ट्रम्प यांचा भारत दौरा :

24 फेब्रुवारीचा कार्यक्रम 

03.30 वाजता अहमदाबाद येथील नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमानंतर ट्रम्प कुटुंब ताजमहल पाहण्यासाठी 24 फेब्रुवारी रोजी आगरा येथे दाखल होणार आहे.
4.45 वाजता आग्र्याला पोहोचतील.
05.15 वाजता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना ताजमहाल पाहण्यासाठी घेऊन जाणार आहे.
ताजमहलकडे जाणाऱ्या रस्त्यावर शालेय मुलं आणि दिल्लीकर ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभी असतील... सोबतच ३ हजार कलाकार वाटेत नृत्यही सादर करणार आहेत. या कलाकारांना युपीहून आमंत्रित केलं आहे.
06.45 ला निघून 7.30 ला दिल्लीला पोहोचतील.

25 फेब्रुवारीचा कार्यक्रम

सकाळी 10.00 : ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवन येथे स्वागत
सकाळी .10.30 महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करतील
सकाळी 11.00 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा होईल.
दुपारी 12.40 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होतील त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद पार पडेल.
संध्याकाळी 7.30 वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींसह चर्चा पार पडेल