Assembly Elections 2023 Exit Polls : मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारी रोजी 88 टक्के मतदान झाले होते. तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. नागालँडमध्ये 84 टक्के तर मेघालयमध्ये 76 टक्के मतदान झाले होते. आज तिन्ही राज्यात मतमोजणी होणार आहे. या राज्यात सत्तांतर होणार की सत्ताधारी पक्ष कायम राहणार, हे मतपेट्या उघडल्यानंतर स्पष्ट होईल. पण त्याआधी तिन्ही राज्यांचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले आहेत. या राज्यात कुणाचे सरकार होतेय?, मतदारांचा कौल काय? याबाबत जाणून घेऊयात..
त्रिपुरात कुणाची सत्ता येणार ?
त्रिपुरात 60 विधानसभा जागांसाठी मतदान झाले होते. सत्ता स्थापन करण्यासाठी 31 जागांची गरज आहे. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार त्रिपुरामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळत आहेत. त्रिपुरात भाजपला 36 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर टीएमपी (टिपरा मोथा) ला 9-16 जागा, लेफ्ट+काँग्रेस यांना 6-11 जागा मिळण्याची शक्यता आहे. अन्य अथवा अपक्षाला एकही जागा मिळत नसल्याचे एक्झिटमध्ये सांगण्यात आले आहे. टाइम्स नाऊ ईटीजीच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 21-27 जागा मिळू शकतात. तर लेफ्ट+ ला 18-24, टीएमपीला 12-17 जागा मिळू शकतात. बहुतेक सर्वच एक्झिट पोलनुसार, त्रिपुरात भाजपचं सरकार येऊ शकतं.
नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपीला बहुमत?
नागालँड विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजप-एनडीपीपी यांच्या युतीला मोठा विजय मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया च्या एक्झिट पोलनुसार, भाजप-एनडीपीपी युतीला 38-48 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर एनपीएफला 3-8 जागा मिळू शकतात. काँग्रेसला एक ते दोन जागा मिळू शकतात. अन्य अथवा अपक्ष पाच ते 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. टाइम्स नाऊ ईटीजीच्या एक्झिट पोलमध्ये भाजप-एनडीपीपीला 39-49 जागा मिळू शकतात. एनपीएफला 4-8 जागांवर विजय मिळतोय. तर काँग्रेसला एकही जागा मिळत नसल्याचे समोर आले आहे. नागालँडमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत, सत्तास्थापन करण्यासाठी 31 जागांवर विजय मिळवावा लागणार आहे.
मेघालयामध्ये त्रिशंकू विधानसभा
मेघालयात त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, येथे एकाही पक्षाला एकहाती सत्ता मिळत नाही. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये एनपीपीला 18-24 जाग मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 4-8 जागा, काँग्रेसला 6-12 जागा तर टीएमसीला 5-9 जागा मिळत आहेत. तर इतर अथवा अपक्ष असे 4-8 जागा येतील. टाइम्स नाउ ईटीजीच्या एक्झिट पोलमद्ये एनपीपीला 18-26 जागा मिळू शकतात. भाजपला 3-6 जागा मिळू शकतात. तर टीएमसी ला 8-14 आणि काँग्रेसला 2-5 जागा मिळण्याची शक्यता आहे.