नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारींच्या संशयास्पद मृत्यूनंतर आता त्यांच्या हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर आज शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये रोहित शेखर तिवारींचा मृत्यू गुदमरुन झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांनी हत्येच्या संशयातून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रोहित शेखर तिवारींच्या मृत्यूप्रकरणी आधी दिल्ली पोलिसांकडे तपास सोपवण्यात आला होता. मात्र आता हे प्रकरण क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलं आहे. क्राईम ब्रांचची टीम आणि सीएफएसएलने रोहित शेखर यांच्या घरी तपास करत पुरावेही गोळा केले.

रोहित शेखर यांच्या पोस्टमार्टममध्ये त्यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचं निष्पन्न झालं आहे, ज्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अज्ञाताविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित शेखर तिवारी 15 एप्रिल रोजी बाहेरुन घरी परतले. घरातील नोकरांचा जबाब आणि सीसीटीव्ही फूटेजवरुन रोहित मद्यधुंद अवस्थेत घरी परतल्याचं स्पष्ट झालं आहे. घरी परतताच ते आपल्या खोलीत जाऊन झोपले. 16 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास रोहित शेखर यांचा मृतदेह संशयास्पद स्वरुपात सापडला होता. दरम्यानच्या काळात रोहित यांना कुणीही उठवण्याचा प्रयत्न केला नाही.

रोहित शेखर यांच्या हृदयाची क्रिया बंद पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती होती. रोहित यांना मंगळवारी 16 एप्रिल रोजी संध्याकाळी दिल्लीच्या साकेत मॅक्स रुग्णालयात मृतावस्थेत आणलं होतं. डॉक्टरांनी 5.50 वाजता त्यांना मृत घोषित केलं.

कोर्टात खटला, 6 वर्षांनी अधिकार मिळाला

मागील वर्षी 18 ऑक्टोबर 2018 रोजी एनडी तिवारी यांचं निधन झालं होतं. 2008 मध्ये रोहित शेखरने कोर्टात खटला दाखल करुन एनडी तिवारीच आपले बायोलॉजिकल वडील असल्याचा दावा केला होता. यानंतर 2011 मध्ये तिवारी यांना डीएनए तपासणीसाठी रक्त द्यावं लागलं होतं. रक्त तपासणीचा अहवाल सार्वजनिक न करण्याची विनंती एनडी तिवारींनी कोर्टात केली होती. परंतु कोर्टाने ही विनंती फेटाळली.

अखेर डीएनए रिपोर्टमध्ये एनडी तिवारीच रोहित शेखरचे बायोलॉजिकल वडील असल्याचं समोर आलं. मोठ्या कायदेशीर लढाईनंतर एनडी तिवारींनी राहुल शेअर आपला मुलगा असल्याचं मान्य केलं होतं. यानंतर तिवारी यांनी 2014 मध्ये वयाच्या 89 व्या वर्षी लग्न केलं. कोर्टातील वाद संपल्यानंतर रोहित वडिलांसोबतच राहत होता.

रोहित शेखर 2017 मध्ये भाजपमध्ये सामील झाला होता. एक वर्षापूर्वी त्याने अपूर्वा शुक्लासोबत लग्न केलं होतं. मूळची इंदूरची असलेली अपूर्वा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करते. रोहितच्या साखरपुड्याच्या वेळी एनडी तिवारी यांच्यावर मॅक्स रुग्णालयातच उपचार सुरु होते.