बुलंदशहर : लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया काल पार पडली देशातील 95 लोकसभा मतदारसंघात काल मतदान झाले. उत्तर प्रदेशात देखील मोठ्या उत्साहात मतदान प्रकिया पार पडली. मात्र युपीच्या बुलंदशहरमध्ये घडलेल्या एका घटनेने मात्र खळबळ उडाली आहे.


मतदान करताना चुकून भाजप उमेदवारांच्या समोरील बटन दाबल्याने नाराज झालेल्या एका बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्याने आपले बोट कापून काढले आहे. पवन असे या 25 वर्षीय युवकाचे नाव आहे. विशेष म्हणजे मतदान केल्यानंतर पवनने ज्या बोटाला शाई लावली तेच बोट कापून टाकले आहे.

बुलंदशहरमध्ये 18 एप्रिल रोजी लोकसभेची निवडणूक पार पडली.  या ठिकाणी बुलंदशहर लोकसभा भाजपकडून भोला सिंह, काँग्रेसकडून बंसी पहाडिया आणि बसप (गठबंधन) कडून  योगेश वर्मा निवडणुकीच्या मैदानात आहेत. पवनला बसपाचे उमेदवार योगेश वर्मा यांना मतदान करायचं होतं, मात्र चुकून त्याने भाजपला मत दिलं.

यानंतर पवनाला स्वतःचाच राग आला आणि त्याने आपल्या हाताचे शाई लावलेले बोट कापून टाकले. शिक्रापूर येथील अब्दुल्लापूर हुलासन गावात राहणाऱ्या पवनला वर्मा यांना मतदान करायचे होते पण त्याने चुकून सिंग यांच्या नावासमोरचे बटन दाबले. मात्र आपली चूक लक्षात येईपर्यंत त्याचे मत नोंदवले गेले होते. हत्तीच्या चित्रासमोरील बटन दाबण्याऐवजी कमळामच्या फुलासमोरील बटन दाबल्याने मी माझे बोट कापून घेतले, असं पवनने पत्रकारांशी बोलताना सांगितले.