Mumbai-Madgaon (Goa) Vande Bharat Express : देशात 19 वी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ही मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव म्हणजे मुंबई (Mumbai) ते गोवा (Goa) अशी सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या वंदे एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या वंदे भारत एक्सप्रेसमुळे गोव्याचा प्लॅन करणं सहज शक्य होणार आहे. तर कोकणवासियांना देखील आरामदायी प्रवास करता येणार असल्याचं म्हटलं जात आहे.मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस आता मुंबई आणि गोवेकरांच्या सेवेत आल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
मुंबई - गोवा वंदे भारत एक्सप्रेस ही जवळपास 765 किमी प्रवास करणार असून दोन्ही रांज्यामधील अंतर आता केवळ आठ तासांमध्ये पूर्ण करता येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु सध्या मान्सूनच्या वातावरणामुळे ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून केवळ तीनच दिवस धावणार असल्याची माहिती देखील रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारच ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. तर मान्सून नंतर शुक्रवार शिवाय ही रेल्वे उर्वरित सर्व दिवशी धावणार आहे.
'या' स्थानकांवर थांबणार वंदे भारत एक्सप्रेस
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सकाळी 05.25 मिनिटांनी ही गाडी सुटेल. त्यानंतर दादर (05.32), ठाणे (05.52), पनवेल (06.30), खेड (08.48), रत्नागिरी (10.40), कणकवली (12.45), थिविम (02.24) या स्थानकांवर थांबेल. तर गोव्यातील मडगांव या स्थानकावर ही गाडी दुपारी 3.30 वाजता पोहचेल.
गोव्यातील मडगाव स्थानकावरुन ही गाडी दुपारी 12.20 मिनिटांनी सुटेल. त्यानंतर थिविम (01.06), कणकवली (02.18), रत्नागिरी (04.55), रत्नागिरी (04.55), खेड (06.40), पनवेल (09.00), ठाणे (09.35), दादर (10.05) या स्थानकांवर थांबेल. त्यानंतर ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकावर रात्री 10.25 मिनिटांनी पोहचेल.
वंदे भारत एक्सप्रेसचा तिकीट दर किती?
मुंबई ते मडगाव एसी चेअर कारसाठी एकूण 1815 इतके रुपये भाडे आकारण्यात येणार आहेत. यामध्ये 379 रुपये कॅटरिंगचे भाडे देखील समाविष्ट करण्यात आले आहे. तर एक्झिक्युटिव्ह चेअर कार क्लाससाठी 3360 इतके भाडे आकारण्यात येणार आहे.
तर मडगाव ते मुंबई एसी चेअर कारसाठी एकूण 1,970 भाडे आकारण्यात येणार आहे. एक्झिक्युटिव्ह चेअर कार क्लाससाठी 3,535 रुपये तिकीट दर आकारण्यात येईल. या वंदे भारत एक्सप्रेसला एकूण आठ कोच असणार आहेत.
मुंबईत आतापर्यंत तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या आहेत. या आधी मुंबईत मुंबई ते अहमदाबाद , मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर ही वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे. तर मुंबई ते गोवा ही मुंबईतून सुटणारी चौथी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे.