नवी दिल्लीः मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प येत्या सहा वर्षात पूर्ण होईल. या प्रवासाचं शुल्क विमान प्रवासापेक्षा कमी असेल, असं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज लोकसभेत बोलताना सांगितलं.
मुंबई-अहमदाबाद या मार्गावर येत्या सहा वर्षात हायस्पीड ट्रेन धावणार आहे. हा महत्वकांक्षी प्रकल्प महागडा असल्याने हा प्रवास देखील सर्वसामान्यांना परवडणारा नसेल, असा अंदाज लावला जात होता. मात्र सुरेश प्रभू यांनी हा प्रवास सर्व सामान्यांना परवडणारा असेल, असं स्पष्ट केलं आहे.
हायस्पीड बुलेट ट्रेनच्या 508 किमीचा मुंबई-अहमदाबाद हा प्रवास केवळ दोन तासात करण्यात येणार आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे अहमदाबाद आणि मुंबई ही दोन महत्वाची आर्थिक महानगरं जोडली जाणार आहेत.