नागपूर : नागपूरच्या उमरेड अभयारण्याची ओळख बनलेला जय हा तरणाबांड वाघ 18 एप्रिलपासून बेपत्ता आहे. त्याला शोधण्यासाठी 100 हून अधिक स्वयंसेवकांनी शोधमोहीम राबवली आहे.

 

जय : आशियातील सर्वात मोठा वाघ



आशियातील सर्वात मोठा वाघ अशी जयची ओळख आहे. तब्बल 250 किलो वजन असलेला हा तरणाबांड वाघ या अभयारण्याची ओळख बनला होता. कित्येकदा पर्यटक या वाघाची एक झलक पाहण्यासाठी उमरेडला भेट द्यायचे. मात्र अचानक हा वाघ  गायब झाल्याने वन्यप्रेमींच्या काळजीत भर पडली आहे.

 

तीन वर्षांपूर्वी जोडीदाराच्या शोधात जय उमरेडमध्ये



जोडीदाराच्या शोधात तीन वर्षांपूर्वी जय नद्या, शेत, इतकंच नाही तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा 100 किमी प्रवास करुन उमरेड अभयारण्यात आला होता. यानंतर तो सगळ्यांचा आवडता वाघ बनला. मात्र सहा वर्षांचा हा वाघ 18 एप्रिलपासून बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी वन्यप्रेमी, फोटोग्राफर्स, स्वयंसेवक तसंच गाईड यांनी जयच्या शोधासाठी मोहीम राबवली आहे.

 

350 गावांमध्ये जयचा शोध



हे स्वयंसेवक शेजारच्या 350 गावांमध्ये जयचा शोध घेणार आहेत. वर्धा, चंद्रपूर तसंच ज्या ठिकाणाहून जय आला त्या नागझिरा नवेगाव टायगर रिझर्व्ह हे स्वयंसेवक पिंजून काढणार आहेत. अभयारण्यात वाघांची गणना करण्यासाठी गळ्यात रेडिओ कॉलर बसवण्यात येतं. मात्र ते यंत्रही बंद पडल्यामुळे जयला शोधण्यात सध्या अडचणी येत आहेत.

 

जय मागील वर्षीही दोन महिन्यांसाठी गायब झाला होता, अशी माहिती वनअधिकारी रोहित कारु यांनी दिली.