मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा पगार गेल्या नऊ वर्षांपासून बदललेला नाही. 2008 पासून अंबानी वार्षिक 15 कोटी रुपये पगार घेतात.
मुकेश अंबानी हे जगातील विसाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 31.3 बिलियन डॉलर म्हणजेच 2 लाख 2 हजार 230 कोटी रुपये इतकी त्यांची एकूण संपत्ती आहे.
2008-09 या आर्थिक वर्षापासून अंबानींनी आपला भत्ते, कमिशन कमी करुन पगार 15 कोटी रुपयांवर रोखला आहे. त्यापूर्वी त्यांचा पगार वार्षिक 24 कोटी रुपये होता.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना 38.75 कोटी रुपये वेतन मंजूर करण्यात आले आहे, मात्र व्यवस्थापकीय पातळीवर आदर्श उदाहरण ठेवण्यासाठी मुकेश अंबानींनी 15 कोटी रुपये पगार घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं रिलायन्सच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे.
2007-08 मध्ये 44 कोटी रुपयांचं पॅकेज असलेले मुकेश अंबानी भारतातील हायेस्ट पेड एक्झिक्युटिव्ह होते.