पणजी : गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर आणि अपक्ष रोहन खंवटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय या मंत्र्यांना कळवला असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी दिल्लीतूच जाहीर केलं.


सरकारमधील गोवा फॉरवर्डचा सहभाग दोन वर्षे व चार महिन्यांनंतर आता संपुष्टात येणार आहे. नव्या चार मंत्र्यांचा उद्या शनिवारी शपथविधी होणार आहे. मार्च 2017 मध्ये मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाले होते. पर्रिकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले. त्यानंतर गोवा फॉरवर्डचे तीन आणि दोन अपक्ष मंत्र्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवण्यात आले होते.


लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिण गोव्यात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. केंद्रात पुन्हा मोदी सरकार पूर्ण शक्तीने अधिकारावर आले. यानंतर गोवा सरकारमधील समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी भाजपच्या कोअर टीमसोबत गुरुवारी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी दिल्लीत चर्चा केली. विजय सरदेसाई, रोहन खंवटे आदींसोबत काम करताना अडचणी येतात असं मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांना कळवले.


आता काँग्रेसचे दहा आमदार भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपचे संख्याबळ 27 झाले. त्यामुळे गोवा फॉरवर्डचे तिघे आणि अपक्ष खंवटे या चौघा मंत्र्यांना डच्चू द्यावा असा निर्णय झाला. हा निर्णय चौघाही मंत्र्यांना शुक्रवारी पाच वाजेर्पयत कळवावा, असं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सांगितलं.