ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून परिपत्रक काढून यासंदर्भात घोषणा करण्यात आली. परिपत्रकात म्हटले आहे की, “खासदार राजीव सातव यांना गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्त करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.”
गुजरात म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं होमग्राऊंड. त्यामुळे पंतप्रधानांच्या होमग्राऊंडवर काँग्रेसला उभारी देण्याची जबाबदारी राजीव सातव यांच्या रुपाने एका मराठी आणि तरूण नेत्यावर आली आहे.
विशेष म्हणजे, गुजरात विधानसभेच्या निवडणुकीवेळी खासदार राजीव सातव यांनी सह-प्रभारी म्हणून काम पाहिले होते आणि गुजरातमध्ये भाजपला जेरीस आणण्यास राजीव सातव यांनीही मोठी भूमिका पार पाडली होती. तिथे त्यांच्यावर हल्लाही झाला होता.
राजीव सातव हे काँग्रेसमध्ये या घडीला संपूर्ण राज्याचा प्रभार दिलेले सर्वात तरुण नेते ठरले आहेत. याशिवाय गुजरातमध्ये काँग्रेस अध्यक्ष अमित चावडा (42 वर्षे) विरोधी पक्षनेते, परेश धनानी (41 वर्षे) आणि प्रभारी राजीव सातव (43) अशी सगळी युवा टीम बनली आहे.
आता काँग्रेसचे प्रभारी म्हणून राजीव सातव हे कसे काम करतात आणि मोदींना होमग्राऊंडवर किती आव्हान उभे करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.