भोपाळ : बहुमत चाचणीआधीच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी अवघ्या 15 महिन्यातच राजीनामा दिला आहे. कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. कमलनाथ दुपारी एक वाजता राज्यपालांची भेट घेऊन आपला राजीनामा सोपवणार आहेत.


काँग्रेसच्या आमदारांच्या राजीनाम्यानंतर भाजपने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन मध्य प्रदेश विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली होती. यावर सुप्रीम कोर्टाने निकाल देत आज (20 मार्च) पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याआधीच कमलनाथ यांनी राजीनामा दिला.


पत्रकार परिषदेत कमलनाथ यांनी भाजपवर अनेक आरोप केले. भाजपने लोकशाहीचा गळा घोटला, असं ते म्हणाले. "भाजपला जनता माफ करणार नाही. 15 महिन्यात आम्ही प्रदेश माफिया मुक्त केला. भाजपला हे मान्य नव्हतं. 15 वर्षांच्या भाजपच्या कार्यकाळात काय झालं हे प्रत्येक नागरिकाला माहित आहे. राज्याच्या जनतेचा विश्वासघात झाला आहे. भाजपला 15 वर्ष मिळाली होती, मला केवळ 15 महिने मिळाले. अडीच महिने लोकसभा निवडणूक आणि आचारसंहितेत गेले. राज्याच्या प्रत्येक नागरिक साक्षीदार आहे की, मी जनतेच्या हिताचं कार्य केलं आहे. पण भाजपच्या हे पचनी पडलेलं नाही. त्यामुळे त्यांनी आमच्याविरोधात सातत्याने काम केलं."