हणमंतराव सारथी यांच्या कुटुंबाला लष्करी सेवेची पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील रेवणसिद्द्पा सारथी हे सेनेमध्ये कॅप्टन म्हणून निवृत्त झाले आहेत. तर त्यांचा एक भाऊ रवी हे सुद्धा हवाई दलात वैमानिक म्हणून सेवा बजावत आहेत. हणमंतराव यांचे पोस्टिंग सध्या मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे होते. दैनंदिन सरावासाठी त्यांनी ग्वाल्हेर येथून उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या विमानाची आणि अन्य एका विमानाची आकाशात धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत त्यांना वीरमरण आले. त्यांच्या मागे आईवडील, पत्नी, दोन मुले, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांचा पार्थिव आज हवाई दलाच्या खास विमानाने बेळगावात आणणार आहेत. सारथी यांच्यवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील मोरेना येथे शनिवारी सकाळच्या सुमारास सुखोई-20 आणि मिराज 2000 ही दोन विमानं कोसळली. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर येथील हवाई तळावरून उड्डाण केलं होतं. अपघातावेळी सुखोई-30 मध्ये दोन वैमानिक आणि मिराज 2000 मध्ये एक वैमानिक होता. यातील मिराजमधील वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. तर, सुखोई-30 मधील दोन्ही वैमानिक गंभीर जखमी आहेत. सुखोई-30 आणि मिराज 2000 ही दोन्ही विमानं आकाशातच धडकली आणि आकाशात स्फोट झाला. याबाबत हवाई दलाकडून या दुर्घटनेची सखोल चौकशी होणार आहे तसेच, या अपघाताची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस अनिल चौहान यांनी हवाई दलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे.
मुरैनाचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
मुरैनाचे जिल्हाधिकारी अंकित अस्थाना यांनी सांगितले की, "दोन्ही विमानांचे अवशेष जिल्ह्यातील पहाडगड भागात पडले. मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थानमधील भरतपूर भागातही काही अवशेष पडले आहेत." दरम्यान, संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना हवाई दलाच्या प्रमुखांनी या अपघाताबाबत माहिती दिली. त्यांनी पायलटांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.