Sukhoi-30 and Mirage 2000 Crashed in Madhya Pradesh : भारतीय वायुसेनेची Indian Air Force (IAF) दोन लढाऊ विमाने सुखोई-30 (Sukhoi-30) आणि मिराज-2000 (Mirage 2000) मध्य प्रदेशातील मुरैना (Morena) जिल्ह्यात शनिवारी सकाळी नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान कोसळली. या भीषण अपघातात लढाऊ सुखोई विमानातील दोन पायलट सुदैवाने वाचले, पण मिराजमधील पायलटचा करुण अंत झाला.
अपघात नेमका कसा घडला?
सुखोई-30 (Sukhoi-30) आणि मिराज-2000 (Mirage 2000) या दोन्ही अपघात झालेल्या विमानांनी आज सकाळी ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते. दरम्यान, सुखोई आणि मिराज या दोन लढाऊ विमानांची समोरासमोर टक्कर झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, या घटनेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखोई- 30MKI विमानाचे दोन पायलट सुरक्षितपणे बाहेर पडले तर मिराज-2000 च्या पायलटचा मृत्यू झाला. हवाई दलाने म्हटले आहे की, "दुर्घटनेत सामील असलेली दोन्ही विमाने नियमित ऑपरेशनल फ्लाइंग ट्रेनिंग मिशनवर होती. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत." हवेमध्ये दोन्ही विमानांची धडक झाली की नाही याची चौकशी करण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्यात येणार आहे.
मुरैनाचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
मुरैनाचे जिल्हाधिकारी अंकित अस्थाना यांनी सांगितले की, "दोन्ही विमानांचे अवशेष जिल्ह्यातील पहाडगड भागात पडले. मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थानमधील भरतपूर भागातही काही अवशेष पडले आहेत." दरम्यान, संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना हवाई दलाच्या प्रमुखांनी या अपघाताबाबत माहिती दिली. त्यांनी पायलटांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत."
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून चौकशीचे आदेश
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राजनाथ सिंह यांनी सीडीएस अनिल चौहान आणि हवाई दलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी अपघाताची माहिती मागवली आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मुरैना येथील कोलारसजवळ हवाई दलाच्या सुखोई-30 आणि मिराज-2000 विमानांच्या अपघाताची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. हवाई दल त्वरीत बचाव आणि मदत कार्यात आहे. विमानांचे पायलट सुरक्षित आहेत अशी मी देवाला प्रार्थना करतो.”
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही ट्विटरवर आपली चिंता व्यक्त केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मुरेना येथील कोलारसजवळ हवाई दलाच्या सुखोई-30 आणि मिराज-2000 विमानांचा अपघात झाल्याची दुःखद बातमी मिळाली आहे."
इतर महत्वाच्या बातम्या