नवी दिल्ली : मध्य प्रदेशात 28 जागांवर घेण्यात आलेल्या पोट निवडणूकांमध्ये रिंगणात उतरलेल्या 12 मंत्र्यांपैकी तीन मंत्र्यांना निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागत आहे. तर नऊ मंत्री निवडणूकीत विजयी झाले. सर्व मंत्र्यांनी मार्चमध्ये काँग्रेसचं सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपला साथ दिली होती. यामध्ये भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक होते.अशातच या पोट निवडणुकांमध्ये मध्यप्रदेशात 28 जागांपैकी 19 जागांवर भाजपने बाजी मारली आहे.


पोटनिवडणुकांच्या निकालांनुसार, मध्य प्रदेश सरकारमधील ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक दोन मंत्री इमरती देवी डबरा 7,633 मतांनी आणि गिर्राज दंडोतिया दिमनी 26,467 मतांनी निवडणूकीत पराभूत झाले. याव्यतिरिक्त एक दुसरे मंत्री एदल सिंह कंषाना यांचा सुमावली येथून 10,947 मतांनी पराभव झाला.


मध्य प्रदेशात विधानसभेच्या 28 जागांसाठी पोट निवडणुका घेण्यात आल्या होत्या. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 230 सदस्यांच्या विधानसभेच्या 28 जागांसाठी एकत्रच पोटनिवडणूका घेतल्या गेल्या. या निवडणुकांमध्ये मध्यप्रदेशातील 12 मंत्र्यांसह एकूण 355 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते.


बिहार लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपचा विजय


बिहार विधानसभा निवडणूकीसह वाल्मिकी नगर येथील लोकसभा पोटनिवडणूकीचे निकालही हाती आले आहेत. या जागेवर नीतीश कुमार यांचा पक्ष जेडीयूचे सुनील कुमार यांचा विजय झाला आहे. त्यांनी महागठबंधनमधून काँग्रेस उमेदवार प्रवेश कुमार मिश्रा यांना 22,539 मतांनी मात दिली आहे. काँग्रेस उमेदवार मिश्रा याआधी पत्रकारितेत बराच काळ काम केलं आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रवेश मिश्रा यांच्यासाठी मतं मागितली होती. वाल्मिकीनगर लोकसभा पोटनिवडणूकीत 7 उमेदवार मैदानात उतरले होते.


गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यानंतर आठ जागांवर पोट निवडणुका घेण्यात आल्या. यांपैकी 5 आमदार भाजपच्या तिकीटावर पुन्हा निवडणूक लढले होते. गुजरातमधील सर्वच्या सर्व जागांवर भाजप विजयी झाला आहे.


पोटनिवडणुकांमध्येही भाजपचाच बोलबाला


गुजरात : 8 पैकी 8 जागांवर भाजप विजयी
मध्य प्रदेश : 28 पैकी 19 जागांवर भाजप विजयी
कर्नाटक : दोन्ही जांगावर भाजपची बाजी
उत्तरप्रदेश : 7 पैकी 5 जागांवर भाजप विजयी
तेलंगणा : भाजपचा विजय
मणिपूर : 5 पैकी 4 जागांवर भाजपची सत्ता


दरम्यान, देशातील 11 राज्यांमधील 58 विधानसभा जागा आणि बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसाठी 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी पोट निवडणूका घेण्यात आल्या होत्या. काल (मंगळवारी) बिहार विधानसभा निवडणुकांसोबतच या पोटनिवडणुकांचेही निकाल जाहीर करण्यात आले. मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली होती.


महत्त्वाच्या बातम्या :