भोपाळ : कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे अनेक नोकरदारांना वर्क फ्रॉम होम करावं लागत आहेत. त्यातच आता अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही, होणार असतील तर कधी? असे प्रश्न उपस्थित झाले असताना, मध्य प्रदेश सरकारने एक्झाम फ्रॉम होम म्हणजेच घरी बसून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.


कोरोना महामारीच्या संकटात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांवरुन महाराष्ट्रात एकीकडे सरकार विरुद्ध यूजीसी असा वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. मात्र मध्य प्रदेशच्या शिवराज सरकारने महाविद्यालयांच्या अंतिम परीक्षांसाठी ओपन बुक प्रणालीचा उपाय शोधला आहे.


विद्यापीठाकडून या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रश्नपत्रिका पाठवली जाईल, ज्याची उत्तरं घरात बसूनच उत्तरपत्रिकेत लिहावी लागणार आहे. ओपन बुक प्रणालीतून मिळवलेल्या गुणांचे 50 टक्के वेटेज आणि मागील वर्षांत मिळवलेल्या गुणांचे 50 टक्के वेटेज यावरुन विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात होईल. यंदा मध्य प्रदेशात 5 लाख 71 हजार विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत.


युजीसीच्या सुधारित गाईडलाइन्सनुसार विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार


सरकारने पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांसह पीजीच्या तिसऱ्या सेमिस्टर अभ्यासक्रमाच्या परीक्षा न घेता अंतर्गत गुणांच्या सरासरीनुसार पास करण्याचे आदेश जारी केले होते. परंतु अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत उच्च स्तरावर चर्चा सुरु होती. अंतिम वर्षाच्या परीक्षेतही प्रमोट केल्यास शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या पदवीवर प्रश्न उपस्थित केले जातील, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली. त्यातच यूजीसीनेही सुधारित नियमावली जाहीर करत सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याच्या निर्देश दिले आहेत. यानंतर मध्य प्रदेश सरकारने ओपन बुक प्रणालीनुसार परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.


अशी होणार ओपन बुक सिस्टमने परीक्षा!
विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन आयडी आणि निश्चित वेबसाईटवर प्रश्नपत्रिका उपलब्ध केल्या जातील. विद्यार्थ्यांना घरी राहूनच उत्तरपत्रिका लिहिण्याची सोय असेल. ही उत्तरपत्रिका घराजवळच्या एखाद्या शाळेत जमा करुन त्याची पावती विद्यार्थ्यांना घ्यावी लागेल. याशिवाय ई-मेल आणि पोस्टाद्वारे उत्तरपत्रिका पाठवण्याची सुविधाही असेलच. विद्यार्थी कोणत्याही एका पर्यायाचा वापर करु शकतात.


गुण कसे निश्चित केले जाणार?
विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याची प्रणालीही तयार करण्यात आली आहे. ओपन बुक प्रणालीद्वारे मिळालेल्या गुणांचं मूल्यांकन 50 टक्के असेल, तर उर्वरित 50 टक्के हे मागील वर्षाच्या प्राप्त गुणांवरुन निश्चित केलं जाईल.


'अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणं', राज्य सरकारचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र


ओपन बुक परीक्षा प्रणाली नेमकी काय?
ओपन-बुक परीक्षा प्रणालीत विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपले नोट्स, पाठ्यपुस्तकांची मदत घेण्याची परवानगी असते. विद्यार्थ्यांना आपल्या घरात बसून वेबपोर्टलहून आपापल्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका डाऊनलोड करुन त्यांची उत्तरं उत्तरपत्रिका लिहिण्याची सुविधा दिली जाते.


इतर विद्यार्थ्यांसाठीचा नियम
पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या तसंच पीजी दुसऱ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना जनरल प्रमोशन देण्याचा आदेश आधीच जारी केला आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे मागील वर्षांचे गुण आणि चालू सत्राच्या अंतर्गत गुणांच्या सरासरीवरुन आगामी सत्राची प्रवेश प्रक्रिया घेतली जाईल.