नवी दिल्ली: गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घसरण होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात केवळ 81 लोकांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत 87 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच देशातील कोरोनाच्या रिकव्हरी दरात वाढ होऊन तो 97.31 टक्क्यांवर पोहचला आहे.


देशात कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आता एक लाख 36 हजार 872 इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाचे नऊ हजार 121 रुग्ण आढळले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस देण्यास सुरुवात झाली आहे.


देशात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ही एक कोटी नऊ लाख 25 हजार 720 इतकी झाली आहे. यामध्ये एक लाख 55 हजार 813 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत एक कोटी सहा लाख 33 हजार 25 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाचा मृत्यू दर हा 1.43 टक्के इतका घसरला आहे.


Corona Vaccine: WHO ने दिली अॅस्ट्राजेनका लसीच्या आपातकालीन वापराला मंजूरी


देशातील 31 राज्यांमध्ये पाच हजारांहून कमी अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 79.69 टक्के रुग्ण ही केवळ पाच राज्यामध्ये आढळतात. भारतातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपैकी 69.41 टक्के रुग्ण हे महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांत आढळतात. ही सर्व आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे


देशात सुरु असलेल्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने येत्या जुलै महिन्यापर्यंत 25 कोटी भारतीयांचं लसीकरण पूर्ण करण्याचं ध्येय ठेवलंय. त्या दृष्टीने वरिष्ठ स्तरावर नियोजन सुरु आहे. महत्वाचं म्हणजे या 25 कोटी लोकांना कोरोनाचा डबल डोस देण्याचं नियोजन केंद्र सरकार करत आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येत आहे.


येत्या जुलै महिन्यापर्यंत भारतातील जवळपास 20 ते 25 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी 40 ते 50 कोटी डोस उपलब्ध करणे आणि त्याचा वापर करणे यासाठीचे नियोजन सुरु आहे. तसेच त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, प्रशिक्षण या क्षमतामध्ये वाढ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं होतं.


Corona Alert | कोरोना फोफावतोय, कठोर निर्णय घ्यावे लागतील; अजित पवारांचे संकेत