नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानने दिलेल्या वागणुकीविरोधात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत आवाज उठवला. संसदेचं कामकाज सुरु होताच, खासदार अरविंद सावंत यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडलं.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचं आजचं कामकाज सुरु होताच, लोकसभेच्या सभागृहात शिवसेना खासदार अरविंद सावंत आक्रमक झाले आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यास सुरुवात केल्या.
त्यानंतर, अरविंद सावंत यांच्यासोबत विरोधकही एकत्र येत घोषणा देऊ लागले.
काल कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने इस्लामाबादमध्ये जाऊन कुलभूषण जाधव यांची भेट घेतली. मात्र यावेळी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना अपमानास्पद वागणूक दिली.
https://twitter.com/AGSawant/status/945903505822195712
21 महिन्यानंतर आई-लेकाची भेट
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव 25 डिसेंबरला आई आणि पत्नीला भेटले. परंतु पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात या भेटीसाठी खास काचेच्या भिंतींची इंटरकॉम रुम तयार करण्यात आली होती.
कुलभूषण जाधव यांना काचेच्या एका बाजूला बसवलं होतं, तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती. यांच्या मध्ये असलेल्या काचेच्या भिंतीमधून पाकिस्तानचा अमानवीय चेहरा समोर आला.
कुलभूषण यांची आई-पत्नीशी बोलणं झालं पण ते ही फोनच्या माध्यमातून.
पाकिस्तान सरकारनेभेटी दरम्यान, कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र, बांगड्या आणि टिकली काढायला लावली होती. तसंच त्यांना आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत बोलण्यास मज्जाव करण्यात आला होता.
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतातून त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचे सांगलीतील असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहे.
कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.
जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे.
‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.