नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये सापडलेल्या 'मोगली गर्ल' प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. जौनपूरमध्ये राहणाऱ्या एका इसमाने कथित 'मोगली गर्ल' आपली मुलगी असल्याचा दावा केला आहे. तिचं नाव अलिजा असून ती मूकबधिर असल्याचं हमिद अली नामक इसमाने म्हटलं आहे.

दोन महिन्यांपूर्वी बहराईचच्या जंगलात माकडांच्या टोळीसोबत एक चिमुरडी सापडल्याचा दावा पोलिसांनी केला होता. 'ही मुलगी माकडांप्रमाणे चार पायांवर चालत होती. माकडांसोबतच खेळत होती. झाडांवरुन उड्या मारत होती. माकडांसारखेच हावभाव करत होती. तिच्या अंगावर कपडेही नव्हते.' असा दावा संबंधित पोलिसांनी केला होता.

जिल्हा रुग्णालयाने या चिमुरडीला 'पूजा' असं नाव दिलं, तर पोलिसांनी तिचं 'वनदुर्गा' असं नामकरण केलं आहे. त्यानंतर या 'मोगली गर्ल' प्रकरणाला वेगळा ट्विस्ट मिळाला आहे. जौनपूरमधील हमिद अली नावाच्या इसमानं ही आपली मुलगी 'अलिजा' असल्याचा दावा केला आहे.

पोलिसांनी तिच्या पालकांचा शोध सुरु केला होता. त्यासंदर्भात उत्तर प्रदेशातील विविध भागात पोस्टर्सही लावण्यात आले होते. हे फोटो पाहून हमिद अली यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत मुलीचा ताबा मागितला.

जंगलात आढळली मोगली गर्ल, माकडांच्या टोळीसोबत राहणारी चिमुरडी!


28 मार्च 2016 ला अलिजा आपल्या घरातून एकाएकी बेपत्ता झाली होती. शोधाशोध करुनही ती न सापडल्यामुळे जौनपूरमधल्या बादशाहपुरी पोलिसात ती हरवल्याची तक्रार दिल्याचं हमिद यांनी सांगितलं. वर्षभराने न्यूज चॅनेलवर तिचा फोटो पाहिल्याने आपला जीव भांड्यात पडल्याचं ते म्हणतात.

हमिद यांच्या माहितीनुसार अलिजा कच्चं मांस खाते आणि जेवण जमिनीवर पाडून खाण्याचीच तिला सवय आहे. मात्र ती दोन पायांवरच चालते. अलिजाला चार बहिणी एक भाऊ आहे, असं हमिद सांगतात. बाईकवर आपटल्यामुळे तिच्या कपाळाला जखम झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.

कथित 'मोगली गर्ल'ला उपचारासाठी लखनऊला पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता हमिद अली सुद्धा लखनऊच्या दिशेनं रवाना झाले आहेत.

A

पोलिसांनी काय दावा केला होता?

दोन महिन्यांपूर्वी बहराईचच्या जंगलात माकडांच्या टोळीसोबत एक चिमुरडी सापडल्याचा दावा पोलिसांनी केला होता. 'ही मुलगी माकडांप्रमाणे चार पायांवर चालत होती. माकडांसोबतच खेळत होती. झाडांवरुन उड्या मारत होती. माकडांसारखेच हावभाव करत होती. तिच्या अंगावर कपडेही नव्हते.' असा दावा संबंधित पोलिसांनी केला होता.

जंगलात पेट्रोलिंग सुरु असताना पोलिसांना माकडांच्या एका टोळीचं दुसऱ्या टोळीशी भांडण सुरु होतं. त्या भांडणात ही चिमुरडी जखमी झाली आणि बेशुद्ध पडली. पोलिसांनी हवेत गोळीबार करुन माकडांना पांगवलं. माकडांनी तातडीनं झाडांवर धाव घेतली. त्यावेळी ही मुलगी पोलिसांच्या हाती लागली. पोलिस त्या मुलीला घेऊन जात असताना माकडांच्या टोळीनं पोलिसांच्या गाडीचाही पाठलाग केला.

बेशुद्धावस्थेत असलेल्या मुलीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. पण शुद्धीवर आल्यावर त्या मुलीने आकांडतांडव सुरु केला. माकडांसारखे आवाज काढून, ती ओरडू लागली. खाण्याची ताटं भिरकावून पडलेलं अन्न खाऊ लागली, असं पोलिसांनी म्हटलं होतं.