मुझफ्फरनगर : माझा मुलगा दहशतवादी असल्यास त्याला शिक्षा व्हायलाच हवी, असं संतप्त आवाहन लष्कर ए तोयबाचा हस्तक असल्याच्या आरोपातून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी अटक केलेल्या संदीपकुमार शर्माच्या आईने केलं आहे.
उत्तर प्रदेशच्या एटीएस टीमने संदीप शर्मा यांची आई पार्वती आणि वहिनी रेखा यांची चौकशी केली. चौकशीनंतर दोघींनाही सोडून देण्यात आलं.
'जर माझा मुलगा दहशतवादी असेल, तर त्याला शिक्षा व्हायलाच हवी. त्याच्या कृत्यांमुळे आम्हाला त्रास भोगावा लागत आहे. समाजात आमची मान शरमेनं खाली गेली आहे.' असं पार्वती शर्मा म्हणाल्या. पार्वती आणि रेखा या घरकाम करुन उदरनिर्वाह करतात, तर त्याचा भाऊ हरिद्वारमध्ये टॅक्सी चालवतो.
संदीप शर्मा उर्फ आदिलने 2012 मध्ये राहतं घर सोडलं होतं. जम्मूमध्ये महिना 12 हजार रुपयांवर नोकरी करत असल्याचं त्याने कुटुंबीयांना सांगितलं होतं. 2007 मध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता.
संदीप कुमार मुझफ्फरनगरचा रहिवासी आहे. एटीएम फोडणे आणि बँक लुटण्याबरोबरच शस्त्रात्रांचीही त्यानं चोरी केली होती. गेल्या 28 वर्षात पहिल्यांदाच एखाद्या बिगर-काश्मिरी नागरिकाला काश्मिरमधील दहशतवादी कारवायांबद्दल अटक करण्यात आली आहे.
जून महिन्यात काश्मीरमध्ये पोलीस उपनिरीक्षक फिरोज डार यांच्यासह सहा पोलिसांची हत्या केल्याचा आरोप संदीप शर्मावर आहे.