मुंबई : देशातल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने शहरे आणि ठिकाणांची नावे बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या नामकरणाची मागणी होत आहे. इतिहासकार इरफान हबीब यांनी ही मागणी मांडली आहे. हबीब यांचे म्हणणे आहे की, शहरे आणि रस्त्यांची नावे बदलली जात आहेत. परंतु त्यापूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांची नावे बदलावी. कारण 'शाह' हा फारसी भाषेतला शब्द आहे.


हबीब यांच्या मुद्द्याचे एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी समर्थ केले आहे. ओवेसींनी भाजपाला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, 'उत्तर प्रदेशातील शहरांची नावे बदलली जात आहेत. अलाहाबादचे आणि फैजाबाद या शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. शाह हा शब्द फारशी भाषेतून आला आहे, त्यामुळे आता अमित शहा स्वत:चे नाव कधी बदलणार?' असा सवाल ओवेसी यांनी एका सभेत बोलताना उपस्थित केला.

ओवेसींसह जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि उत्तर प्रदेशमधले मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी भाजपच्या नामकरणांना विरोथ केला आहे. मेहबुबा म्हणाल्या की, विकासकामांपासून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी सरकारने नामकरणाचा मुद्दा उचलला आहे.

भाजपचे उत्तर प्रदेशमधील आमदार संगीत सोम म्हणाले की, मुजफ्फरनगरचे नाव बदलून लक्ष्मी नगर करायला हवे. तर गुजराचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सांगितले की 2019 च्या निवडणुकांपूर्वी अहमदाबादचे नाव बदलून कर्णावती केले जाईल.