नवी दिल्ली : शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी गृह मंत्रालयाच्या खात्यात 10 कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. 'भारत के वीर' अॅप आणि वेबसाईट अंतर्गत आतापर्यंत 10.18 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली असून ही समिती निधीचं वाटप कशाप्रकारे करता येईल, याचं नियोजन करणार आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या संकल्पनेनंतर गृह मंत्रालयाने या अॅपची सुरुवात केली होती.

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी अक्षय कुमारच्या संकल्पनेतून नवं अॅप तयार करण्यात आलं. ‘भारत के वीर’  असं या वेब पोर्टलचं नाव असून, त्याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते एप्रिलमध्ये दिल्लीत झालं. या कार्यक्रमाला अक्षय कुमारची प्रमुख उपस्थिती होती.

या पोर्टलच्या माध्यमातून इच्छुकांना शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करता येते. या पोर्टलसाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या माध्यमातून शहीदांच्या कुटुंबीयांना ही मदत पोहचवण्याचं काम केलं जाणार आहे.

दान करणाऱ्या व्यक्तीला गृह मंत्रालयाकडून सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. कोणताही व्यक्ती शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करु शकतो. एका जवानाच्या कुटुंबाला जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची मदत करता येईल. 15 लाख रुपयांची मर्यादा पूर्ण झाल्यास संबंधित जवानाच्या नावाचा पर्याय वेबसाईटवरुन आपोआप हटवला जाईल. त्यानंतर दुसऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करता येऊ शकते.