नवी दिल्ली : सामान्यांसह शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देवभूमी केरळमध्ये मान्सूनने (Monsoon) वर्दी दिली आहे. भारतीय हवामान विभागाने ट्विटरवरुन याची माहिती दिली. केरळच्या काही भागात पावसाच्या सरी बरसल्या, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
काही दिवसांपासून केरळात दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल होण्याची स्थिती निर्माण झाली होती. अखेर वरुणराजाने केरळात बरसायला सुरुवात केली आहे. यंदा मान्सून केरळात सामान्य वेळेपेक्षा उशिरा पोहोचला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, केरळमध्ये वर्दी दिल्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल सुरु होईल. 11 जून रोजी महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून 3 जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा मान्सून केरळमध्ये वेळेपेक्षा उशिरा पोहोचला आहे. "केरळमध्ये पावसामध्ये वाढ झाली आहे. दक्षिण अरबी समुद्रात खालच्या पातळीवर पश्चिमेकडे वारे वाहू लागले आहेत," असंही आयएमडीने म्हटलं आहे.
केरळमध्ये सामन्यत: 1 जून रोजी मान्सून दाखल होतो. परंतु यंदा दोन दिवस उशिरा वरुणराजाने हजेरी लावली. याआधी आयएमडीने यंदा मान्सून केरळमध्ये 31 मे म्हणजेच चार दिवस आधी पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता. परंतु केरळमध्ये अद्याप मान्सून येण्याची स्थिती निर्माण झालेली नाही अशी माहिती 30 मे रोजी दिली. दरम्यान आयएमडीच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सून सामान्य राहिल.
स्कायमेटचा दावा काय होता?
दरम्यान हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या संस्थेने 30 मे 2021 रोजीच केरळात मान्सून दाखल झाल्याचा म्हटलं होतं. मान्सून वेळेवर दाखल झाल्याचा दावा स्कायमेटने आपल्या ट्वीटमध्ये केला होता.
संबंधित बातम्या