मुंबई : केरळमध्ये मान्सून 1 जून ऐवजी 3 जूनला दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यानंतर स्कायमेट वेदरने मान्सून केरळात दाखल झाल्याचं म्हंटलंय. खासगी हवामान संस्थेकडून केरळात मान्सून 30 मे रोजी दाखल झाल्याचे म्हटल्यानं सामान्य माणूस गोंधळात पडला आहे.


 स्कायमेट वेदर या खासगी संस्थेनं म्हटलंय की, मान्सून आगमनाचे निकष पूर्ण झाले असून केरळच्या बहुतांश भागात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार झाला होता. मात्र, मान्सूनच्या आगमनावेळी परिस्थिती पूर्ण अनुकूल नसल्यानं त्याचा प्रभाव कमी जाणवत असल्याचं म्हणणं आहे. मात्र, असं असलं तरी स्कायमेट वेदरनं केलेल्या दाव्यानंतर ट्विटरवर अनेकांकडून स्कायमेटवर टीका होताना बघायला मिळत आहे. मान्सूनचे निकष पूर्ण होत नसताना देखील मान्सून धडकला हा स्कायमेट वेदरचा पब्लिसिटी स्टंट असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. 


 






 


भारतीय हवामान विभागाकडून सर्वात आधी 31 मे रोजी मान्सून केरळात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, चक्रीवादळानंतर मान्सूनसाठी वातावरण जरी अनुकूल असले तरी वाऱ्यांचा वेग कमी आहे. मान्सून येण्याच्या निकषात 14 हवामान केंद्रांपैकी 60 टक्के स्टेशन्समध्ये 2.5 मीमी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस सलग दोन दिवस नोंदवला गेला पाहिजे. मात्र, केरळातील 14 हवामान केंद्रांपैकी फक्त 7 हवामान केंद्रांमध्येच पाऊस झाला आहे. म्हणजे फक्त 50 टक्के ठिकाणीच पाऊस 2.5 मीमी किंवा त्याहून अधिक ठिकाणी नोंदवला गेला आहे. त्यामुळे निकष पूर्ण होत नसल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 


त्याचसोबत पश्चिमी वाऱ्यांची उंची आणि त्याचा वेग आदी निकष पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र, तसं होत नसल्याचं हवामान विभागातील एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितले आहे. उद्यापासून मात्र, दक्षिण-पश्चिमी वाऱ्यांचा प्रवाह जोर धरण्याची शक्यता असल्यानं 3 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे.