नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांसह सामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा मान्सून सामान्य असेल. यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 96 ते 100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दिल्लीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत हवामान विभागाने मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला.
देशात कोरोना व्हायरसचं संकट आणि लॉकडाऊन असताना मान्सूनचा अंदाज अतिशय महत्त्वाचा समजला जात आहे.
भारतात सामान्यत: जून महिन्याच्या मध्यात मान्सूनची सुरुवात होते आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सून परततो. यंदा पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता 21 टक्के आहे तर सामन्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता 20 टक्के आहे.
मान्सूनचं प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या केरळमध्ये 1 जूनपर्यंत पाऊस वर्दी देईल अशी आशा आहे. तर चेन्नईत 4 जून, पणजीमध्ये 7 जून, हैदराबादमध्ये 8 जून, पुण्यात 10 आणि मुंबईत 11 जूनपर्यंत दाखल होईल अशा अंदाज आहे.
शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी चांगल्या मान्सूनची प्रतीक्षा असतेच. तांदूळ, गहू, ऊस यांसारख्या खरीप हंगामात येणाऱ्या पिकांसाठी मान्सूनची नितांत आवश्यक असते. अशातच हवामान विभागाने यंदा मान्सून सामान्य राहिल असा पहिला दीर्घकालीन अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.