मुंबई : पुढील दोन दिवसात मान्सून केरळात दाखल होणार आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं दिली आहे. तर महाराष्ट्रातही 2 ते 3 जून दरम्यान पूर्व मोसमी पाऊस होण्याची शक्यता कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे.
ज्या मान्सूनची तुम्ही-आम्ही आतुरतेनं वाट पाहतो आहोत, तो पुढच्या 48 तासात देवभूमीत दाखल होतो आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. श्रीलंकेत दाखल झालेला मान्सून केरळमार्गे देशात आणि राज्यात दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यानंही शेतीच्या कामाची लगबग सुरु केली आहे.
अकोला, अमरावतीत मुसळधार पाऊस
दरम्यान, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात अचानक मान्सूनपूर्व पाऊस झाला. काल दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तिकडे अमरावतीतही मुसळधार पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो क्विंटल माल पावसात भिजला.