Rana Ayyub Money Laundering Case : : राजकीय नेत्यांपाठोपाठ आता पत्रकारही ईडीच्या रडारवर येऊ लागलेत. पत्रकार राणा अयुब (Rana Ayyub) यांची 1 कोटी 77 लाख रुपयांची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. ईडीचा फेरा सध्या राजकीय वर्तुळात तर चर्चेत असतोच. पण आता पत्रकारही त्या लिस्टवर दिसतायत. पत्रकार राणा अयुब यांची 1.77 कोटी रुपयांची संपत्ती ईडीनं जप्त केलीय. क्राऊड फंडिग साईटवरुन मिळवलेला मदतनिधी गैरपद्धतीनं वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आलीय. यावर राणा अयुब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
राणा अयुब यांच्याकडून सर्व आरोपांचे खंडन
राणा अयुब यांनी देणगी म्हणून मिळालेल्या निधीच्या गैरवापराच्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म Ketto वर पैसे कसे उभे केले आणि त्यानंतर कसे खर्च केले याचे तपशील जारी केले आहेत. राणा अयुब यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, माझ्यावरी आरोप निराधार, भ्रामक आणि काल्पनिक आहेत. त्यांनी सांगितलं आहे की, Ketto वर हाती घेतलेल्या माझ्या तीन मोहिमांमध्ये मी एकूण ₹2,69,44,679 (सुमारे 26.9 दशलक्ष) जमा केले होते. माझ्याद्वारे हाती घेतलेल्या मदत कार्यासंबंधातील सर्व बिले आणि पावत्या पुरवल्या आहेत.
अयुब यांनी म्हटलं आहे की, कोविडच्या अनुभवावरून असे दिसून आले आहे की सध्याच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांना पूरक अशी तातडीची गरज आहे. तात्पुरते कोविड हॉस्पिटल सुरू करण्याच्या माझ्या प्रयत्नांना खूप वेळ लागत होता. म्हणून मी रूग्णांच्या उपचारात मदत करण्यासाठी सार्वजनिक अनुदानीत हॉस्पिटलमध्ये देणगी देण्याचा निर्णय घेतला.
राणा अयुब कोण आहेत
37 वर्षांच्या राणा अयुब या मोदी सरकारच्या प्रखर टीकाकार पत्रकार म्हणून ओळखल्या जातात. 2002 च्या गुजरात दंगलीवर गोध्रा फाईल्स या पुस्तकाच्या त्या लेखिका. शिवाय वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रासाठी स्तंभलेखनाचंही काम त्या करतात. राणा अयुब यांच्याविरोधात सप्टेंबर 2021 मधे गाझियाबादमध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली होती. हिंदू आयटी सेल या एनजीओचे संस्थापक विकास संक्रितायन यांनी अयुब यांनी मदतनिधी गोळा करुन त्याचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. त्याच आधारावर ईडीनं ही जप्तीची कारवाई केली आहे.
राणा अयुब यांनी मदतनिधी कुटुंबासाठीच वापरल्याचा आरोप
2020 ते 21 या काळात तीन मोहीमांसाठी अयुब यांनी किटो या क्राऊड फंडिग साईटवरुन निधी गोळा केला.
आसाम बिहार, महाराष्ट्रातल्या पुरासाठी मदत आणि झोपडपट्टीवासियांना मदत, कोरोना काळातली मदत मोहीम यासाठी त्यांनी हा फंड उभा केला
जवळपास 2 कोटी 69 लाख रुपयांचा मदतनिधी गोळा झाला
पण यातले 72 लाख स्वतच्या नावावर, 37 लाख बहिणीच्या खात्यात आणि 1 कोटी 60 लाख रुपये वडिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले
ज्या कामासाठी पैसे गोळा करण्यात आले ते प्रत्यक्षात त्यासाठी खर्च झालेच नाहीत असा आरोप
याच पैशातून 50 लाख रुपयांची एफडी राणा अयुब यांनी केल्याचाही आरोप
74 लाख रुपये अयुब यांनी पीएम केअर फंड आणि सीएम रिलीफ फंडातही जमा केल्याचं दिसतंय.
काही बिलं खोटी असल्याचा तपास यंत्रणांचा दावा
31 लाख रुपये मदतीसाठी वाटल्याचा राणा अयुब यांचा दावा आहे, पण त्यांनी प्रत्यक्षात 17 लाख रुपयांचीच बिलं दिलं. काही बिलं खोटी असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. ईडीची कारवायांवरुन आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सतत पाहायला मिळतं. चूक घडल्यानंतर कारवाई होणारच हा भाजप नेत्यांचा दावा असतो तर केवळ विरोधकांवरच कारवाई कशी होते असं म्हणत विरोधक हल्लाबोल करतात. त्यात आता ही कारवाई पत्रकारांवरही होताना दिसतेय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha