नवी दिल्ली : भ्रष्टाचार आणि काळा पैसा जमवल्याप्रकरणी ईडी(अंमलबजावणी संचलनालय)नं प्रसिद्ध मांस व्यापारी मोइन कुरेशी यांना अटक केली आहे. दिल्लीमध्ये अटकेआधी त्यांची कसून चौकशीही करण्यात आली. मोइन कुरेशी यांना मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.


मोइन यांच्यावर अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये डील केल्याचा आरोप आहे. तसंच या डीलच्या बदल्यात त्यांनी मोठी रक्कम घेतल्याचंही समोर आलं आहे. सीबीआयचे माजी संचालक ए पी सिंह यांच्यावरही मोइन यांच्यासह आरोप ठेवण्यात आला आहे. फेमा आणि पीएमएलए कायद्याअंतर्गत मोइन यांची चौकशी केली जात आहे.

मोइन आपल्या व्हीआयपी संबंधांमुळेही चर्चेत आले होते. सीबीआयचे माजी संचालक ए पी सिंह आणि रणजीत सिन्हा यांच्यासोबत त्यांची विशेष जवळीक असल्याचंही बोललं जात होतं. त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोइन कुरेशींवर कोणते आरोप?

मोइन कुरेशी आणि त्यांच्या मुलीनं अमेरिका, लंडनसह विदेशात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. या खरेदीसाठीचं पेमेंट त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून केलं. मागच्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये दिल्ली हायकोर्टानं मोइन यांना ईडीसमोर हजर राहण्यास सांगितलं होतं.