नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकाही मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिलं नसल्यानं विरोधकांकडून टीका होत होती. त्यातच शनिवारी भाजपने हिंदू कार्ड पुढं करत योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळात मुस्लीम समाजाला स्थान नसेल अशी चर्चा रंगत असताना, आज शपथविधी घेणाऱ्या नावांची यादी जाहीर झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. कारण योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मोहसिन रझा या एकमेव मुस्लीम चेहऱ्याचा समावेश असणार आहे.
योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादाची असल्याने, त्यांच्या मंत्रिमंडळात मुस्लीम चेहरा असेल की नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. पण आज शपथविधी घेणाऱ्या 47 जणांच्या यादीत मोहसिन रझा यांच्या नावाची घोषणा झाल्याने अनेकांना अश्चर्याचा धक्का बसला आहे.
वास्तविक रजा यांच्या निवडीमागे उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याक कल्याण विभाग, वक्फ बोर्ड सोबत इतर प्राधिकरणांवर मुस्लीम व्यक्तीची नियुक्ती करणं बंधनकारक आहे. त्यामुळेच मोहसिन रझा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.
मोहसिन रझा यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपत प्रवेश केला असून, त्यांना उत्तर प्रदेश भाजप प्रवक्तेपदी नियुक्त करण्यात आलं होतं. रझा यांनी राजकीय क्षेत्राशिवाय क्रिडा क्षेत्रातही चमकदार कामगिरी बजावली आहे. रझा यांनी क्रिकेटमध्ये रणजी सामने खेळले आहेत.
40 वर्षीय मोहसिन रजा यांनी गव्हर्नमेंट ज्युबली इंटरकॉलेजमधून शिक्षण घेतलं. यानंतर त्यांनी लखनऊ विद्यापीठातूनही शिक्षण घेतलं आहे. सध्या रजा उत्तर प्रदेशच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नसून, त्यांना सहा महिन्यात कोणत्या तरी एका सदनाचं सदस्यत्व दिलं जाईल.
आजून कोण-कोण शपथ घेणार?