लखनौ : योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर केशव प्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहही उपस्थित होते.


त्याचप्रमाणे, ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, व्यंकय्या नायडू, मुरली मनोहर जोशी, मनोज तिवारी यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला हजर होते. विशेष म्हणजे सपाचे नेते मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव हेही व्यासपीठावर दिसले.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी केशव प्रसाद मौर्य आणि मनोज सिन्हा यांची नावं आघाडीवर होती. मात्र, अखेर योगी आदित्यनाथ यांच्या गळ्यात भाजपनं मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली. योगी आदित्यनाथ यांची ओळख कट्टर हिंदुत्ववादी म्हणून आहे. शिवाय अनेकदा त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे ते टीकेचे धनी देखील ठरले आहेत.

योगी आदित्यनाथ यांचा अल्प परिचय :

महंत योगी आदित्यनाथ यांचा जन्म 5 जून 1972 रोजी उत्तराखंडच्या गढवालमध्ये झाला. त्यांचं मुळ नाव अजय सिंह असं आहे. गढवाल विश्वविद्यालयातून त्यांनी बीएससीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं आहे. 1998 पासून ते गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. याशिवाय आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात.