नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने शनिवारी योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपच्या या निर्णयावर सडकून टीका करताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींनाच लक्ष्य केलं आहे. तर काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनीही आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असुद्दीन औवेसी यांनी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवडीवर टीका करताना पंतप्रधान मोदींचं हेच नव्या भारताचं स्वप्न आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच योगी आदित्यनाथ यांची निवड म्हणजे गंगा आणि यमुनेच्या संगमावर हल्ला असल्याचीही प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.

ओवैसी म्हणाले की, ''योगी आदित्यनाथ यांची निवड म्हणजे पंतप्रधान मोदी आणि भाजपचं 'न्यू इंडिया' आहे. पण यातून जराही अश्चर्य वाटत नाही. कारण, समाजवादी पक्ष जेव्हा सत्तेत होता, तेव्हा त्यांनी मुस्लिमांची फसवणूक केली. पण आता आम्ही एका विशिष्ठ वर्गाचं 'विकास मॉडेल' पाहणार आहोत. जे याच 'विकासा'वर नेहमी बोलत होते.''

तर काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनीही योगी आदित्यनाथ यांच्या निवडीवर खेद व्यक्त केला आहे. खुर्शीद यांनी ट्विट करुन आपला खेद व्यक्त केला आहे. खुर्शीद म्हणाले की, ''योगी आदित्यनाथ आता त्या पदावर विराजमान होतील, ज्या पदावर गोविंद वल्लभपंत, नारायण दत्त तिवारी, सुंदरलाल बहुगुणासारख्या दिग्गजांनी हे पद भूषवलं होतं.''


खुर्शीद यांनी यासोबत एक कविताही ट्विट केली असून, या कवितेतून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. खुर्शीद यांच्या या कवितेत ‘शायद मैं जिंदगी की सहर ले कर आ गया, कातिल को आज अपने ही घर लेकर आ गया’ असं म्हणलं आहे.