PM Modi In Bihar: दरभंगा येथे राहुल गांधी यांच्या मतदार हक्क यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदींच्या आईवरून शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला. संबंधिताला अटकही करण्यात आली आहे. त्यानंतर सातव्या दिवशी, मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी चीनवरून परत येताच बिहार दौरा केला. ते म्हणाले की, बिहारमध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावरून माझ्या आईला शिवी देण्यात आली. ही शिवीगाळ केवळ माझ्या आईचा अपमान नाही तर देशातील माता, बहिणी आणि मुलींचा अपमान आहे. हे बोलताना पंतप्रधान भावूक झाले. त्यांना भावूक झालेले पाहून बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांचेही डोळे पाणावले. मोदींचे हे शब्द ऐकून बिहार राज्य जीविका निधी शाखा सहकारी संघ लिमिटेडच्या कार्यक्रमात आलेल्या महिलाही रडू लागल्या. एलजेपी (रामविलास) अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान यांनीही विरोधकांवर निशाणा साधला.

त्यांनी एक्स वर लिहिले की, "दरभंगा येथे, राजद आणि काँग्रेसच्या व्यासपीठावरून, पंतप्रधान आणि त्यांच्या दिवंगत आईवरून शिवीगाळ झाली. ही काँग्रेस आणि राजदची तीच घृणास्पद मानसिकता आहे, जी भारतीय संस्कृती आणि मूल्यांच्या विरोधात आहे." चिराग पुढे म्हणाले, 'मी आठवण करून देऊ इच्छितो की लोकसभा निवडणुकीदरम्यान, माझ्या आईवरून आणि मलाही राजदच्या मंचावरून शिवीगाळ करण्यात आली होती. या पक्षांचे राजकारण प्रतिष्ठेवर आणि मुद्द्यांवर नसून शिवीगाळ आणि वैयक्तिक हल्ल्यांवर आधारित आहे हे स्पष्ट आहे.'

अमित शाह यांच्या निवासस्थानी बिहार भाजपची बैठक

दुसरीकडे, सर्व पक्षांनी बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जागावाटपाबाबत आघाडीतही मंथन सुरू आहे. आज (3 सप्टेंबर गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बिहार भाजपची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यात कोअर कमिटीचे सदस्य इतर अधिकारी आणि वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. विधानसभा निवडणुकीची रणनीती, जागावाटपाची रूपरेषा, मतदार हक्क यात्रेचा अभिप्राय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा अपमान केल्याबद्दल विरोधकांची प्रतिक्रिया यासारख्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा केली जाईल. भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल म्हणाले की, बिहारशी संबंधित सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा केली जाईल. बैठकीत अमित शहा नेत्यांकडून मतदार हक्क यात्रेचा अभिप्राय घेतील. यात्रेदरम्यान जमलेल्या गर्दी आणि लोकांच्या प्रतिक्रिया, संभाव्य परिणाम, मतदारांवर होणारा परिणाम आणि यात्रेशी संबंधित घटनांबद्दल आम्ही नेत्यांचे मत जाणून घेऊ. मतदार यादीतून नावे वगळल्याबद्दल राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी केलेले दावे, त्यांचा प्रभाव आणि सत्य यावरही चर्चा केली जाईल.

जेडीयू 102 जागांवर, तर भाजप 101 जागांवर निवडणूक लढवू शकते

बिहारमध्ये एनडीए आघाडीच्या जागावाटपाबाबत चित्र जवळजवळ स्पष्ट मानले जात आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अलिकडच्या दिल्ली दौऱ्यानंतर असे म्हटले जात आहे की विधानसभा निवडणुकीत सर्व 243 जागांवर आघाडीतील पक्षांमध्ये अंतिम एकमत झाले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनता दल युनायटेड (जेडीयू) 102 जागांवर आणि भाजप 101 जागांवर निवडणूक लढवणार आहे. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (राम विलास) म्हणजेच लोजपा (आर) 20 जागा, जितन राम मांझी यांच्या हिंदुस्तान अवाम मोर्चा (एचएएम) आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला (आरएलएम) 10-10 जागा मिळाल्या आहेत. सध्या जागावाटपाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. एनडीए लवकरच पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. तथापि, कोणता पक्ष कोणत्या जागांवर निवडणूक लढवेल यावर चर्चा सुरू आहे. या काळात जेडीयू आणि भाजपमध्ये 1-2 जागांचा फरक असू शकतो.

इतर महत्वाच्या बातम्या