बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्वतःच्या जातीचा मागास जातीत समावेश करुन घेतल्याचा आरोप केला होता. त्या आरोपावर जेटली यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 'पंतप्रधानांच्या जातीचा काय संबंध? त्यांनी कधीही जातीचं राजकारण केलेलं नाही. आतापर्यंत त्यांनी फक्त विकासाचं राजकारण केलं आहे', असं ट्वीट जेटली यांनी केलं आहे. तसेच 'जातीचं नाव घेऊन जे लोक गरिबांना फसवत आहेत त्यांना यश मिळणार नाही. जातीचं राजकारण करुन त्यांनी फक्त पैसे कमवले आहेत. बसप किंवा राजद प्रमुखांच्या कुटुंबाकडील संपत्तीच्या प्रमाणात मोदींकडे 0.01 टक्के देखील संपत्ती नाही', असंही जेटली यांनी लिहीले आहे.
पंतप्रधान मोदींनी राजकीय फायद्यासाठी त्यांच्या जातीचा वापर केल्याचा आरोप बसप अध्यक्ष मायावतींनी केला आहे. 'पंतप्रधान मोदी वरच्या जातीतील आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राजकीय फायद्यासाठी स्वतःच्या जातीचा ओबीसीमध्ये समावेश करुन घेतला', असा आरोप मायावतींनी केला आहे.