पणजी : पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे ज्येष्ठ पुत्र उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारली आहे. भाजपने माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी दिली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना उत्पल पर्रिकर म्हणाले की, पक्षाचा निर्णय मला शिरसावंद्य आहे. राजकारणात अडथळे पार करुन पुढे जायचे असते. तेच मी करणार आहे. पक्षाने सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी दिल्याने आता पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारुन मी काम करणार आहे.

तब्बल 25 वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मतदारसंघातील उमेदवारीसाठी उत्पल पर्रिकर आणि माजी आमदार कुंकळ्येकर यांची नावे गोवा प्रदेशतर्फे केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आली होती. केंद्रीय समितीने उत्पल यांना डावलून कुंकळ्येकर यांना उमेदवारी दिली आहे.

उत्पल पर्रिकर म्हणाले की, पक्षाने माझ्या उमेदवारीबाबत ठरवले तर मी आहे, असे मी म्हटले होते. राजकारण स्वच्छ करण्यासाठी राजकारणात येण्याची इच्छा होती. मनोहर पर्रीकर यांनीही नेहमी हीच इच्छा बाळगली होती. त्यांनाही सुरुवातीला बरेच अडथळे आले. राजकारणात अडथळे पार करुनच पुढे जायचे असते, मी तेच करणार आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आणि प्रचारातही सहभागी होणार आहे.