हेरात (अफगाणिस्तान) : भारताच्या मदतीने अफागाणिस्तानमध्ये बांधण्यात आलेल्या सलमा धरणाचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तपणे बटन दाबून धरणाचं उद्घाटन केलं.


 

हे धरण बांधण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला 1700 कोटी रुपयांची मदत केली. अफगाणिस्तानच्या विकासात भारताने नेहमीच महत्त्वपूर्ण वाटा उचलला आहे. हे धरणही त्याचंच उदाहरण मानलं जातं.

 

यावेळी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदी यांना अफगाणिस्तानमधील सर्वोच्च पुरस्कार अमीर अमिनुल्ला खार पुरस्कारानेही गौरवले.

 

चौथा अमेरिका दौरा, तर दुसरा अफगाणिस्तान दौरा

 

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा चौथा अमेरिका दौरा आहे आणि दुसरा अफिगाणिस्तान दौरा आहे. याआधी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मोदी अफगाणिस्तानात गेले होते. अफगाणिस्तानातील संसद इमारतीचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं होतं.

 

सलमा धरण भारताच्या दृष्टीने महत्त्वाचं का?

 

  • अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात चिश्ती शरीफजवळ हरिरुद नदवर भारताने सलमा धरण बांधलं आहे.

  • हे धरणं बांधण्याचा निर्णय 2006 साली घेण्यात आला होता. शिवाय, त्याच वर्षी धरणाचं कामही सुरु करण्यात आलं होतं.

  • 107 मीटर उंच, 550 मीटर लांब आणि 500 मीटर रुंद असं हे धरण आहे.

  • खरंतर हे धरण एक वर्ष आधीच बनलं आहे. मात्र, गेल्या वर्षी जुलैमध्ये धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले होते.

  • धरणाचा 20 किमी लांब आणि 3.7 किमी रुंद भाग पाण्याने भरण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला.

  • या धरणावर 42 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाईल. यामुळे जवळपास 80 हजार हेक्टर शेतीसाठी सिंचनाची सोय होणार आहे.