नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात विरोधक एकवटले असून, दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जोरदार टीका केली. काळा पैसा बाहेर आला का? असा सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना केला आहे. यावेळी राहुल गांधींनीही मोदींवर जोरदार निशाणा साधला.
ममता बॅनर्जी कडाडल्या!
"नोटाबंदीनंतर विकासाच्या योजना ठप्प झाल्या आहेत. नोटाबंदीमुळे लोकांचे 'बुरे दिन' आले आहेत. या निर्णयामुळे देश 30 वर्षे मागे गेला आहे.", असा घणाघात ममता बॅनर्जी यांनी केला. शिवाय, नियोजन नसल्याने नोटाबंदी फसली असल्याची टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली.
नोटाबंदीमुळे किती काळा पैसा बाहेर आला?, असा सवाल करत ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं. त्या म्हणाल्या, "नोटाबंदीचा निर्णय घेताना संसदेलाही विश्वासात घेतलं नाही. हा निर्णय म्हणजे देशात सर्वात मोठी अघोषित आणीबाणी आहे. लोकांच्या मुलभूत अधिकारांवर घाला घातला जातोय."
नोटाबंदीमुळे गरिबांना त्रास सहन करावा लागत आहे. 'अच्छे दिन'च्या नावाने शेतकरी आणि गरिबांची लूट सुरु आहे, अशी टीकाही ममता बॅनर्जींनी केली. यावेळी तंत्रज्ञानाचा गवगवा करणाऱ्या पंतप्रधानांना ममता बॅनर्जी यांनी सुनावले, "भारतात तंत्रज्ञानाचा विकास राजीव गांधी यांनी केला आहे. राजीव गांधी यांनीच देशात आधुनिक तंत्रज्ञान आणलं."
राहुल गांधींचाही पंतप्रधान मोदींवर निशाणा
"नोटाबंदीमुळे काळा पैसा किंवा भ्रष्टाचारावर कोणताही परिणाम झाला नाही. उलट काळा पैसा पांढरा करणारे दलाल तयार झाले आहेत.", असा आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला. शिवाय, नोटाबंदीमुळे ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्याला जबाबदार कोण?, असा सवालही राहुल गांधींनी मोदींना विचारला.
"पंतप्रधानांनी देशाला सांगावं डिमॉनिटायझेशनचं नेमकं उद्दिष्ट काय होतं आणि ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्याकरता ते काय करणार?", असा सवाल करत राहुल गांधींनी मोदींवर आरोप केला की, "गेल्या 60 वर्षात यंदा म्हणजे 2016 या वर्षात सर्वाधिक बरोजगारी वाढली."
नोटाबंदीच्या निर्णयाचा आज 49 वा दिवस आहे, तर मोदींच्या 50 दिवसांच्या दाव्याला 3 दिवस बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्ला चढवला.