नवी दिल्ली : 30 डिसेंबरनंतर हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा जवळ बाळगणं तुम्हाला महागात पडू शकतं. 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा तुमच्याकडे सापडल्यास त्यावर दंड आकारण्याचा विचार केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्राकडून लवकरच यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात येईल.


नियमांचा भंग केल्यास किमान 50 हजार किंवा सापडलेल्या रकमेच्या पाचपट रक्कम दंड म्हणून भरावा लागण्याची शक्यता आहे. जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुभा देण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून अद्याप या माहितीला दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र, उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे. याच बैठकीत यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आरबीआय नवनवीन नियम, निर्णय जाहीर करते आहे. त्यामुळे नागरिकांना रोज नव्या नियमाने नोटाबंदीला सामोरं जावं लागत आहे. त्यात 30 डिसेंबरला जुन्या नोटा जमा करण्याची मुदतही संपते आहे. त्यामुळे केंद्र सरकार नवीन कोणता नियम लागू करतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.