नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवून सरकार स्थापन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदींच्या नव्या मंत्रीमंडळाचे आज खातेवाटप करण्यात आले. मोदींच्या नव्या मंत्रीमंडळाची दुपारी बैठक झाली. या बैठकीत मोदी 'सरकार 2' च्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन 5 जुलै रोजी हा अर्थसंकल्प सादर करतील.


17 जूनपासून संसदेचे कामकाज सुरू होणार आहे. संसदीय अधिवेशन 26 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान 19 जून रोजी नव्या लोकसभा अध्यक्षांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. 5 जुलै रोजी अर्थसंकल्प मांडला जाईल.

निर्मला सीतारमण या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री होत्या. त्यानंतर आता सीतारमण याच देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्रीही असतील. त्यामुळे 5 जुलै रोजी एखाद्या महिलेने देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याची तुरळक घटना घडणार आहे.

दरम्यान, सीतारमण यांच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आणि देशातल्या बेरोजगारांसाठी कोणती धोरणं आणणार? गरीबांसाठी कोणत्या नव्या योजना आणणार? या प्रश्नांची उत्तरे 5 जुलै रोजी मिळतील.

दोन वर्षांच्या कालावधीत संसदेत राफेलच्या मुद्द्यावरुन धुरळा उठला, तेव्हा निर्मला सीतारमण यांनी निकराने खिंड लढवली. खुद्द शाह-मोदी यांनीही निर्मला सीतारमण यांचं कौतुक केलं होतं. वैद्यकीय कारणामुळे गेल्या वेळी अरुण जेटली यांच्या अर्थ मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. आता अर्थ मंत्रालयाचा भार वाहण्यासाठी निर्मला सज्ज आहेत.

निर्मला सीतारामन यांचा परिचय
तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीत मध्यमवर्गीय कुटुंबात निर्मला यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 रोजी झाला. त्यांचे वडील रेल्वेमध्ये नोकरी करत होते. सातत्याने बदली होत असल्यामुळे निर्मला यांचे बालपण अनेक गावांमध्ये गेलं. निर्मला यांच्या आईला वाचनाची प्रचंड आवड होती. त्यातूनच निर्मला यांनाही गोडी लागली.

तामिळनाडूमध्ये बीए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीतील जेएनयू अर्थात जवाहरलाल नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि एक हुशार विद्यार्थिनी असा लौकिक मिळवला. अर्थशास्त्र विषयात निर्मला यांनी मास्टर्स डिग्री संपादन केली.