नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे. मोदींच्या नव्या मंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी आज त्यांच्या पदभार स्वीकारला. त्यानंतर आज (शुक्रवारी) दुपारी मंत्रीमंडळाची बैठक बोलावण्यात आली. नव्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारने पंतप्रधान किसान योजनेत आणि पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत बदल केला आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ आता देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. सरसकट सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे 15 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. याआधी 5 एकरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या (अल्पभूदारक) शेतकऱ्यांना सरकारकडून 6 हजारांचा निधी दिला जात होता. मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी या निर्णयाची माहिती दिली.

तोमर यांनी सांगितले की, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेद्वारे आतापर्यंत 3 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना निधी वितरीत करण्यात आला आहे. या योजनेवर पूर्वी 75 हजार कोटी रुपये खर्च होत होता. आता त्यामध्ये 12 हजार कोटी रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी 87 हजार कोटी रुपये खर्च होणार आहे.

60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाणार आहे. त्यासाठी या पेन्शनमध्ये सहभागी शेतकऱ्यांना दिवसाला दोन ते सहा रुपये प्रिमियम भरावा लागणार आहे.

व्हिडीओ पाहा



दरम्यान, मोदींच्या नव्या मंत्रीमंडळाने शहीदांच्या कुटुंबासाठी पहिला निर्णय घेतला आहे. नक्षलवादी आणि दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्य पोलिसांच्या मुलांचा शिष्यवृत्ती योजनेत बदल करण्यात आला आहे. या शिष्यवृत्तीत 500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेतंर्गत दर महिन्याला देण्यात येणाऱ्या मुलांच्या शिष्यवृत्तीची रक्कम दोन हजारावरुन अडीच हजार आणि मुलींच्या शिष्यवृत्तीची रक्कम 2250 वरुन तीन हजार रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.


राष्ट्रीय संरक्षण निधीअंतर्गत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत बदलांना मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर काही वेळाने पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे या निर्ण्याची माहिती जाहीर केली.