नवी दिल्लीः मोदी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमीत्त करण्यात आलेल्या जाहिरातबाजीवर तब्बल 35.58 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे. मोदी सरकारला 26 मे रोजी सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाले, त्यानिमीत्त 35.58 कोटी रुपयांची जाहिरातबाजी करण्यात आली.
माहिती अधिकर कार्यकर्ते अनिल गलगली यांनी देशभरातील जाहिरातीवर करण्यात आलेल्या खर्चाची माहिती मागवली होती. डीएव्हीपीने देशभरातील 11 हजार 236 वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातींची माहिती दिली आहे.
मोदी सरकारच्या ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, विकासाची गती, गुंतवणूक अशा सरकारच्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी हा निधी खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती डीएव्हीपीने दिली आहे. गलगली यांनी काँग्रेस सरकारच्या काळात द्वितीय वर्षपूर्तीनिमीत्त किती खर्च करण्यात आला याचीही माहिती मागवली होती. मात्र काँग्रेसने कसलंही जाहिरात अभियान राबवलं नव्हतं अशी माहिती, डीएव्हीपीने दिली आहे.
सरकारने परदेश दौऱ्यांचा खर्च पीएमओच्या वेबसाईटवर जाहीर केला आहे. त्याच पद्धतीने जाहिरातींबद्दलची माहितीही पीएमओच्या वेबसाईटवर सार्वजनिक करावी, अशी मागणी गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.