नवी दिल्ली : उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये दरड कोसळली आहे. दरड कोसळून रस्त्यावर दगड आणि मातीचा खच पडला होता. शिवाय, दरडीचा काही भाग नदीपर्यंत पोहोचला. सुदैवाने दरड कोसळण्याच्या दुर्घटनेवेळी त्या ठिकाणी कोणतीही गाडी किंवा नागरिक नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली.


 

ज्या रस्त्यावर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली आहे, तो रस्ता  तिबेट सीमेकडे जातो. जोशीमठ-मलारी महामार्गावरील रैणी गावाजवळ ही दरड कोसळली. दुर्घटनेवेळी जवळच असणाऱ्या नागरिकांनी दरड कोसळण्याची घटना कॅमेऱ्यात कैद केली.

 

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या मार्गावरील वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला होता. काही तासांपर्यंत वाहतूक ठप्प होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस गाड्यांच्या लांबच लांब रांगा होत्या. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे या परिसरात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत.