नवी दिल्लीलवकरच तुम्ही रात्री साडे तीन वाजता मॉल्समध्ये जाऊन शॉपिंग करु शकता. तुमच्या परिसरातली सर्व दुकानं दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरु राहतील. इतकंच काय तुम्हाला एखाद्या सिनेमाचा पहाटेचा शोदेखील पाहू शकता. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने मॉडेल शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट म्हणजेच दुकानं आणि आस्थापना कायद्याला मंजुरी दिली आहे.

 

 

या कायद्यानुसार 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असणारी आस्थापनं त्यांच्या सोयीनुसार रात्रभर सुरु राहू शकतात. त्यामुळे  शहरांपुरती मर्यादित असणारी नाईट लाईफची फॅशन लवकरच गावागावातही पाहायला मिळणार आहे.

 

 

या कायद्याला मंजुरी मिळाल्याने आता महिलांनाही पुरेशा सुरक्षा व्यवस्थेसह रात्रपाळीत काम करता येणार आहे. तसंच कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी, कॅन्टीन, प्राथमिक उपचारांचे साहित्य, स्वच्छतागृहं इत्यादी सोयी सुविधाही उपलब्ध होणार आहेत. मात्र या सवलतीतून उत्पादन क्षेत्रांना वगळण्यात आलं आहे.

 

 

कामगार मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार, हा कायदा राज्य स्वीकारु शकतात. तसंच यात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याची सूट संबंधित राज्य सरकारला असेल.