पाटणा : मला बारावी परीक्षेत फक्त पास व्हायचं होतं, पण पप्पांनी मला टॉपर बनवलं, असं बिहारमध्ये कला शाखेची बनावट टॉपर रुबी रायने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं.


 

 

विज्ञान शाखेतून सौरभ श्रेष्ठ आणि राहुल तर कला शाखेतून रुबी ही विद्यार्थिनी पहिली आली होती.

 

 

बिहारमधील टॉपर घोटाळ्याची चौकशी एसआयटी करत आहे. एसआयटीने बोर्ड कार्यालयातून रुबी राय अटक केली. त्यानंतर तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली असून तिची रवानगी बेऊर कारागृहात करण्यात आली आहे.

 

 

'द इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, रुबी रायने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की, "मी पप्पांना म्हणाले होते की पास करा, त्यांनी तर टॉपर बनवलं. शिवाय बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका मी स्वत: लिहिली नव्हती."

 

सामान्यज्ञानाचीही बोंब, बिहारच्या कथित टॉपर्सवर गुन्हा


 

एका वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रुबी राय बनावट टॉपर असल्याचं समोर आलं होतं. या स्टिंग ऑपरेशनमध्ये बिहारच्या या टॉपर्सना त्यांच्या विषयांतील सोप्या प्रश्नांचीही उत्तरं देता आली नाही. इतकंच नाही रुबीने तिच्या मुलाखतीत 'पॉलिटिकल सायन्स' या विषयाला 'प्रोडिकल सायन्स' म्हटलं होतं. या विषयात काय शिकवलं जातं, असं विचारलं असता ती म्हणाली होती की, स्वयंपाक बनवायला शिकवलं जातं.

 

 

तरविज्ञान टॉपर सौरभ श्रेष्ठनेही साध्या आणि सोप्या प्रश्नांची हास्यास्पद उत्तरं दिली होती. या स्टिंग ऑपरेशननंतर या दोन्ही टॉपर्सची फेरपरीक्षा घेण्यात आली होती. परंतु त्यात ते नापास झाले.