मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीत राज्यात सध्या अनेक नागरिकांना आलेल्या वाढीव वीजबिला संदर्भात चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाकडून ऊर्जामंत्र्यांना वीजबिलांमध्ये दुरुस्ती करण्यात यावी आणि 50 टक्क्यांपर्यत सूट देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, आमदार राजू पाटील, ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव, नयन कदम, कुणाल माईनकर उपस्थित होते. यावेळी जवळपास दीड तास मंत्री नितीन राऊत यांच्यासोबत शिष्टमंडळाची चर्चा झाली. यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने पत्रकारांशी संवाद साधला.


या पत्रकार परिषदेत बोलताना अविनाश अभ्यंकर म्हणाले की, आज आमच्या शिष्टमंडळाने ऊर्जामंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली. या भेटीत आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्या सर्वस्वी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे. यामध्ये आम्ही पहिली मागणी केली होती ती एमएसईबी, बेस्ट किंवा खाजगी कंपन्यांनी नागरिकांना जो वीजबिलाचा शॉक दिला आहे. त्या कंपन्यांतील अधिकाऱ्यांना समज देण्यात यावी. यासोबतच कंपन्यांकडून जी वीज कापण्याबाबत धमकी देण्यात येत होती. त्याबाबत ऊर्जामंत्र्यांनी आश्वस्त केलं आहे की कोणाची वीज कापण्यात येणार नाही. येत्या काही दिवसात मंत्री केंद्राला अनुदान मिळण्यासाठी पत्र पाठवणार आहेत. अनुदान मिळाल्यास वीज दरवाढीचे अनेक विषय संपून जातील.


वर्क फ्रॉम होममुळे वीजबिल वाढलं : ऊर्जामंत्री नितीन राऊत


सध्या लॉकडाऊनमुळे अनेक मुलं गावी आहेत. त्यांच्या घरातील लाईट बंद आहेत. परंतु त्यांना देखील मोठ्या प्रमाणात वीजबिल आलं आहे. मंत्रिमहोदयांनी अशा वीजबिलांत दुरुस्ती करण्याचं मान्य केलं आहे. आम्हाला अशी अनेक बिलं मिळाली होती, जी अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात आली होती. अशी सर्व बिलं आम्ही मंत्र्यांकडे सोपवली आहेत. ऊर्जामंत्र्यांनी अशाप्रकारच्या बिलांची तपासणी केली जाईल आणि जर तफावत आढळली तर त्यामध्ये दुरुस्ती केली जाईल असं आश्वासन दिलं आहे, असं अभ्यंकर यांनी सांगितलं.


आम्ही मागणी केली आहे की अशा दुरुस्त केलेल्या बिलांमध्ये 50 टक्के सूट देण्यात यावी. आम्ही यानिमित्ताने खाजगी कंपन्यांना पैसे कमवायचे धंदे थांबवा असा इशारा दिला आहे. याच सोबत एक बैठक घ्यावी ज्यामध्ये सर्व खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी, एमईआरसी आणि सर्वपक्षीय सदस्यांचं शिष्टमंडळ यांचा समावेश असावा. आम्हाला वाढीव बिलांबाबत एमईआरसीकडून जाणून घ्यायचं आहे. आम्ही शासनाला 100 युनिट पर्यतचं वीजबिल माफ करावं, अशी मागणी केली आहे. त्यांच्याकडून आम्हाला यावर विचार सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे. आमची मागणी आहे जास्तीत जास्त नागरिकांना दिलासा द्यावा. पैसे भरण्यासाठी हफ्त्यांची मुदत द्यावी. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या तर मनसे काय करेल हे सांगण्याची आवश्यकता नाही. मागील 14 वर्षे आम्ही जे केलं तेच करू, असं अभ्यंकर यांनी सांगितलं.


वाढलेलं वीज बिल पाहून तापसी पन्नूला बसला 'शॉक', सोशल मीडियावर शेअर केलं वीज बिल





Inflated Electricity Bill | तुमचं वीजबिल का वाढतंय? ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली माहिती