नवी दिल्ली : देशाचे परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर यांनी आपल्यावर लागलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोंपावर मौन सोडलं आहे. माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत. तसेच आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा एमजे अकबर यांनी दिला आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आरोप झाले आहेत. त्यामुळे राजकीय हेतूने माझ्यावर हे आरोप केल्याचा आरोप अकबर यांनी केला. एमजे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले त्यावेळी ते नायजेरियाच्या दौऱ्यावर होते. मात्र आरोपांमध्ये अडकल्यानंतर त्यांना सरकारने दौरा आटोपून भारतात परत येण्याचे आदेश दिले होते. आज ते भारतात परतले त्यावेळी त्यांनी आपली बाजू मांडत, सर्व आरोपांचं खंडन केलं.
अकबर यांच्यावरील आरोपांची भाजपने दखल घेतली आहे. अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जाईल, असं कालच भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केलं होतं. विरोधी पक्षांनीही अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये अडकल्यानंतर परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर यांना सरकारने नायजेरिया दौरा आटोपून भारतात परत येण्याचे आदेश दिले होते.
काय आहे प्रकरण?
पत्रकार प्रिया रमानी यांनी एम.जे.अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. एम जे अकबर यांचं पत्रकारिता क्षेत्रात मोठं नाव आहे. त्यांचं नाव, सन्मान आणि कार्यामुळे त्यांना परराष्ट्र राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. आता पत्रकार प्रिया रमानी यांनी शोषणाचे आरोप केल्याने माध्यम आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
#MeToo चं वादळ
ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी 20 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप 'तारा' मालिकेच्या लेखिका-दिग्दर्शिका विनता नंदा यांनी केला होता. विनिता नंदा यांनी फेसबुक पोस्ट लिहून अत्याचाराला वाचा फोडली. #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ता, कंगना रनौत, सोना मोहापात्रा, पूजा भट्ट, फ्लोरा सैनी, ज्वाला गुट्टा यांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, गायक कैलाश खेर यांच्यापासून सिनेदिग्दर्शक साजिद खान, विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत.
#MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.