नवी दिल्ली : कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लस घेतलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासाला अडचण येणार नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांना परवानगी देताना WHO मान्यताप्राप्त लस हा महत्वाचा घटक असून त्यात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड यांचा समावेश नसून प्रवासासाठी अडचणी येणार असल्याबाबतचं वृत्त प्रसारित झालं होतं. यावर केंद्रानं हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. जगात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड व्यतिरिक्त इतरही लसी आहेत. प्रत्येक देश त्यांच्या स्वत: च्या मानक आणि उपलब्धतेनुसार लसींना मंजूर करतात, असं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याबाबतचं पीआयबी फॅक्टचेकचं ट्वीट केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रिट्वीट केलंय.






जगात अनेक देशांमध्ये आता लॉकडाऊन हळूहळू उठवला जातोय. पण आंतरराष्ट्रीय प्रवाशांना परवानगी देताना WHO मान्यताप्राप्त लस हा महत्वाचा घटक बनलाय. त्याचमुळे भारतात कोवॅक्सिन ही भारत बायोटेकची लस घेतलेल्यांना मात्र पुढच्या काही दिवसांसाठी तरी अडचण जाणवणार असल्याचं बोललं जात होतं. 


देशाबाहेर प्रवास करु इच्छिणारे भारतीय को-वॅक्सिन पेक्षा कोविशील्ड लसीच्या शोधात आहेत. कुठलीही लस घ्या, परिणामकारता सारखीच असं देशाचं आरोग्यमंत्रालय सांगत असतानाही असं का होतंय तर याचं कारण को-वॅक्सिन जागतिक आरोग्य संघटनेनं मान्य केलेल्या लसींच्या यादीत अजून समाविष्ट नाही. त्याचमुळे अनेक देश केवळ कोविशील्ड लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देतायत. कोरोना काळात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली बनतेय, आणि त्यात मान्यताप्राप्त लस घेतलेल्यांनाच प्रवेश असा नियम अनेक देशांनी लागू केलाय, काही त्या तयारीत आहेत, अशी माहिती होती. 


एरवी देशाबाहेर जायचं तर पासपोर्ट- व्हिसा आवश्यक असतो. पण कोरोनामुळे जीवनशैलीत जे अनेक बदल आणले त्यात आता याही गोष्टीचा समावेश झालाय. कारण तुम्ही कुठली लस घेतलीय यावरच तुम्हाला त्या देशात प्रवेश मिळणार की नाही हे ठरतं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत सीरमची कोविशील्ड, मॉडेर्ना, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, सायनोफार्मसारख्या लसींचा समावेश आहे. पण कोवॅक्सिन मात्र यादीत नाहीय, अशी माहिती आहे.