नवी दिल्ली : येत्या 3 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र, त्याआधीचा केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी आज (शुक्रवार) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.


दरम्यान, काल (गुरुवारी) राजीव प्रताप रुडींनी देखील मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच उमा भारती यांनीदेखील आरोग्याचं कारण पुढे करत आपला राजीनामा सादर केला आहे. उमा भारती यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान, कलराज मिश्र आणि महेंद्रनाथ पांडे यांनी देखील राजीनामा सादर केला आहे. सध्या या चौघांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. आता त्यापाठोपाठ बंडारु दत्तात्रेय यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराआधी अनेक मोठ्या घडामोडी सध्या राजधानी दिल्लीत सुरु आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार येत्या रविवारी म्हणजेच 3 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता होणार असल्याचं समजतं आहे.

दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसंच केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वेमंत्रीपद येण्याची चिन्हं आहेत.

विस्ताराआधी दिल्लीत नव्या नावांच्या चर्चेला उधाण आलं आहे. महाराष्ट्रातून संघाच्या मुशीतून घडलेले विनय सहस्त्रबुद्धे, शिवसेनेचे अनिल देसाई, आनंदराव अडसूळ यांच्यासह मराठा समाजाचा चेहरा म्हणून छत्रपती संभाजीराजे यांचंही नाव चर्चेत आहे.

दुसरीकडे शिवसेनेला अजून दोन मंत्रिपदांची अपेक्षा आहे. एकीकडे 12 खासदार असलेल्या जेडीयूला जर 2 मंत्रिपदं मिळत असतील तर त्यापेक्षा दुप्पट खासदार असून शिवसेनेवर अन्याय का? असा सवाल शिवसेनेनं केला आहे. त्यातच उद्धव ठाकरे मंत्रिपदी राज्यसभेच्या खासदारांची वर्णी लावणार की लोकसभेवरच्या नेत्यांना संधी देणार याचीही उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या :

केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडींचा राजीनामा

उमा भारतींसह चार मंत्र्यांचा राजीनामा सादर