अमेरिकचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियोनी म्हंटले आहे की चीनने भारताच्या उत्तर सीमेवर 60 हजार सैनिकांना तैनात केले आहे. टोकियो येथे संपन्न झालेल्या क्वॉड देशांच्या बैठकीत ते बोलत होते. गेल्या काही काळात चीनने केलेल्या हरकतींवर त्यांनी टीका केली. चीनच्या या कृत्यामुळे क्वॉड देशांसमोर आव्हान निर्माण झाल्याचंही ते म्हणाले. मंगळवारी क्वॉड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची जपानच्या टोकियो येथे बैठक पार पडली.


क्वॉड हा इंडो-पॅसिफिक प्रदेशातील भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा गट आहे. या गटाकडून इंडो-पॅसिफिक प्रदेशातील एकमेकांच्या हितसंबंधांचे संरक्षण केले जाते.

माईक पोम्पियो म्हणाले की, "क्वॉड देश हे जगातील मोठे लोकशाही तसेच मोठ्या अर्थव्यवस्था असणारे देश आहेत. आजच्या घडीला या चारही देशांना चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून मोठा धोका आहे."

लॅरी ओकॉनर यांच्यासोबतच्या आणखी एका मुलाखतीत पोम्पियो म्हणाले की, "क्वॉड देश एक समान हितसंबंध आणि नीती असलेला कार्यक्रम विकसित करत आहेत. याचा वापर या चारही देशांना चीनकडून असलेल्या धोक्याला सामोरे जाताना होऊ शकतो."

पोम्पियो यांनी असेही म्हटले आहे की वुहान व्हायरस आला तेंव्हा ऑस्ट्रेलियाने त्याच्या सखोल तपासाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सरकारने ऑस्ट्रेलियाला धमकावले. आतापर्यंत क्वॉडमधील प्रत्येक देशाने चीनच्या अरेरावीचा सामना केला आहे आणि चीनची कम्युनिस्ट पार्टी ही आपल्यासाठी मोठा धोका आहे हे या देशांतील नागरिकांनाही माहित आहे.

क्वॉडच्या बैठकी दरम्यान माईक पोम्पियोनी एकूण तीन मुलाखती दिल्या. त्यात त्यांनी चीनच्या हेकेखोरीबद्दल सडकून टीका केली.

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन दरम्यान गेले काही दिवस तणावाचे वातावरण आहे. 15 जूनला लडाखच्या गलवान खोऱ्यात या दोन देशांतील लष्कराच्या दरम्यान हिंसक झटापटीची घटना घडली होती. त्यात 20 भारतीय सैनिक शहिद झाले. यात चीनचेही मोठे नुकसान झाल्याचं सांगण्यात येतं. या घटनेनंतर दोन्ही देशांत निर्माण झालेला हा विवाद सोडवण्यासाठी राजनीतिक आणि सैन्य पातळीवर गेले अनेक दिवस चर्चा झाल्या. परंतु त्यातून काही साध्य झाले नाही.
संबंधित बातम्या:

लडाखच्या तणावादरम्यान शीघ्र प्रतिसाद दिल्याबद्दल हवाई दल प्रमुखांनी केली हवाई योद्धांची प्रशंसा


साताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांना वीरमरण, भारत-चीन सीमेवरील संघर्षात जाधव शहीद


मॉस्कोत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीआधी पँगाँगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये गोळीबार; 100 ते 200 राऊंड फायर


लडाखमधील परिस्थिती कशी? LAC वर आतापर्यंत काय काय झालं?; राजनाथ सिंह निवेदन देणार