Microsoft Laysoff : जगातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने 10,000 कर्मचार्‍यांची कपात केली आहे. कंपनीने आपल्या नियामक फायलिंगमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. "या कर्मचाऱ्यांना कंपनीने तात्काळ काम थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आर्थिक परिस्थिती आणि ग्राहकांच्या बदलत्या पसंतीमुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली जात असल्याचे कंपनीने सांगितले. 


मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, "ते आपल्या हार्डवेअर पोर्टफोलिओमध्ये देखील बदल करणार आहेत आणि भाडेतत्त्वावर दिलेली कार्यालये एकत्र करणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट आहे की कंपनी आपली अनेक कार्यालये बंद करण्याची तयारी करत आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला म्हणाले की, ही कपात आमच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. आम्ही काही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची कपात करत असलो तरी महत्त्वाच्या धोरणात्मक क्षेत्रात आम्ही भरती करणे सुरू ठेवू. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून नवीन कॉम्प्युटर प्लॅटफॉर्म तयार करण्यावर भर दिला आहे.  


मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीच्या कामकाजात काही बदल केले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले होते. सत्या नाडेला म्हणाले होते की, मायक्रोसॉफ्ट ग्लोबल चॅलेंजसमोर अप्रभावित राहू शकत नाही आणि येणारी दोन वर्षे कंपनीसाठी सर्वात कठीण असू शकतात.


मायक्रोसॉफ्टचे एकूण 2 लाख 21 हजार पूर्णवेळ कर्मचारी


दरम्यान, अलीकडच्या काही दिवसांत जगभरात मंदीचे गडद संकट आल्यावर मोठ्या टेक कंपन्या त्यांच्या कार्यालयांमध्ये कपातीच्या परिस्थितीतून जात आहेत. कर्मचाऱ्यांसाठी वातावरण खराब असून त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.  अमेरिकेतील अमेझॉन, मेटा सारख्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. आता मायक्रोसॉफ्टने देखील आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. मायक्रोसॉफ्टचे एकूण 2 लाख 21 हजार पूर्णवेळ कर्मचारी असून यापैकी 1 लाख 22 हजार कर्मचारी केवळ अमेरिकेत काम करतात. 30 जून 2022 च्या फायलिंगनुसार, कंपनीचे 99,000 कर्मचारी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत. 


मायक्रोसॉफ्टने कोरोनाच्या काळात बरीच भरती केली होती. मायक्रोसॉफ्टवर नफा टिकवून ठेवण्याचा दबाव आहे, कारण त्यांचे क्लाउड युनिट सलग अनेक तिमाही तोट्यात आहे. पर्सनल कॉम्प्युटरच्या बाजारपेठेचा नकारात्मक परिणाम पाहता मायक्रोसॉफ्टच्या विंडोज आणि इतर उपकरणांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.   


महत्वाच्या बातम्या


Nagpur News : अंनिसचे श्याम मानव यांच्या नागपुरातील कार्यक्रमात गोंधळ, हिंदूंना बदनाम करण्यासाठी सभा घेतल्याचा आरोप