मुंबई : लैंगिक शोषणाविरोधात ट्विटर, फेसबुक यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर आवाज उठवण्यासाठी जगभरात सध्या #MeToo कॅम्पेन जोरात सुरु आहे. कॅम्पेनमध्ये नाना पाटेकर, आलोकनाथ यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांवर आरोप झाले आहेत. अनेक महिलांनी आपल्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवला असून आता या मोहिमेत एक आणखी नाव समोर आले आहे. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्टच्या आईने या कॅम्पेनअंतर्गत खळबळजनक खुलासा केला आहे. 'माझ्यावरही एका सेटवर शूटिंगदरम्यान बलात्काराचा प्रयत्न झाला होता, मात्र मी सुदैवाने बचावले', असा खुलासा आलियाची आई सोनी राजदान यांनी 'द क्विंट' ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.


स्वतः अभिनेत्री असलेल्या सोनी राजदान यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेविरोधात आवाज उठवला आहे. सोनी राजदान यांनी खुलासा करताना सांगितलं आहे की, माझ्यासोबत देखील असाच प्रकार घडणार होता. मी शूटिंगवर होते. त्यावेळी एका व्यक्तीने माझ्यासोबत बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने मी यातून बचावले, असं त्या म्हणाल्या.

राजदान म्हणाल्या की, त्या व्यक्तीच्या परिवाराला त्रास होऊ नये म्हणून मी आजवर गप्प बसले. त्याचा परिवार होता. लहान मुलं होती. त्याच्या चुकीची शिक्षा त्याच्या परिवाराला भोगावी लागली असती. त्या काळातील वातावरण वेगळे होते. मला कुणी समजून घेईल का? कुणी माझ्यावर विश्वास ठेवेल का? अशा प्रश्नांसोबत महत्वाचं म्हणजे त्याच्यावर काही कारवाई होईल की नाही याची शाश्वती नव्हती, असं त्या म्हणाल्या.

आज माझ्यासोबत असे काही घडले असते तर मी निश्चितच वेगळे पाऊल उचलले असते. तक्रारही दाखल केली असती असे सांगत त्यांनी अभिनेते आलोकनाथ यांच्यावरही टीका केली आहे. आलोकनाथ यांच्याविषयी दबक्या आवाजात सगळ्यांना माहिती आहे. ते दारू पिल्यानंतर वेगळ्याच रूपात असतात. त्यांनी माझ्याशी कधी गैरवर्तणूक केली नाही मात्र त्यांची दृष्टी बरंच  काही बोलून जायची असं त्या म्हणाल्या.

काय आहे #MeToo अभियान ?

हॉलिवूड अभिनेत्री अलिसा मिलानोने सुरु केलेल्या #MeToo अभियानाअंतर्गत जगभरातील महिला त्यांच्यासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या घटना सांगत आहेत. अलिसा मिलानोने तिच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराचा खुलासा करताना जगभरातील महिलांना आवाहन केलं होतं की, त्यांनीही अशाप्रकारच्या घटनांबाबत मोकळेपणाने सांगावं. जेणेकरुन ही छोटी किंवा दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही, हे सगळ्यांना कळेल. यानंतर महिलांसोबत घडणाऱ्या लैंगिक शोषणाबाबत जगभरात चर्चा सुरु झाली आहे. कधी ना कधी अशाप्रकारच्या प्रसंगांना सामोरं गेलेल्या महिला #MeToo ह्या हॅशटॅगद्वारे त्यांची कहाणी ट्विटरवर शेअर करत आहेत. #MeToo ट्विटरवर टॉप ट्रेण्डिंगमध्ये आहे. आतापर्यंत सुमारे 30 हजार महिला या हॅशटॅगशी जोडल्या गेल्या आहेत. काही पुरुषांनीही यावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे. हजारो लोकांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हा हॅशटॅग वापरुन आपली कमेंट लिहिली आहे. हॉलिवूडचे निर्माते हार्वी वाईनस्टीन यांच्यावर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. जगभरातून टीका झाल्यानंतर त्यांची ऑस्कर बोर्डावरुन हकालपट्टी झाली. हार्वींच्या अनेक चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. हार्वी यां हॉलिवूडमध्ये मोठं स्थान असल्याने अनेक अभिनेत्री त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी घाबरत होत्या. परंतु आता अनेकींनी पुढे येऊन तक्रारी दाखल केल्या आहेत. यानंतर लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर विषयाकडे जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सोशल मीडियावर #MeToo हा हॅशटॅगद्वारे अभियान सुरु करण्यात आलं आहे, ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.